Saturday, February 29, 2020

अकस्मात

काही दिवस असेच गेले. एका आठवड्याने रघूने रखमाच्या भावाला फोन केला. पुण्याला जाण्याचं निश्चित झालं. सकाळचे सात-साडेसात वाजले असतील. रघूने आपली पिशवी भरली, भिंतीवरचा बायकोचा फोटो काढून हातात घेतला.  क्षणभर फोटोकडं बघत काळजाला लावला आणि आपल्या पिशवीत ठेवला. दुपारच्या शिदोरीचं गाठोड पिशवीत घातलं. मुलाला नवीन कपडे घातले. दोघं घराबाहेर पडले. घराचा दरवाजा लावून त्यानं घराला कुलूप लावलं. एका हाताने पिशवी उचलली, दुसऱ्या हाताने मुलाचा हात पकडला. चार पावलं पुढं गेल्यानंतर त्यानं घराकडं वळून बघितलं. त्याला वाटलं घरच्या भिंतीनी, अंगणातल्या तुळशीने, कोपऱ्यातल्या चुलीने अंगणात जणू काहूर मांडला होता, त्याला अडवण्यासाठी त्या जणू साद देत होत्या. आठवण करून देत होत्या त्याला त्याच्या बायकोची. बायकोच्या आठवणी याच भिंतीच्या आत कोंडून राहतील याची रुखरुख त्याच्या मनात होती. गावाची माती सोडून जातानाची हळहळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. दररोज कामावर जाताना डबा देवून, हात वर करून निरोप देणारी बायको त्याला घरापुढं दिसत होती. त्याला पावलं जड वाटत होती. डोळ्यात पाणी तरारलं होतं. आपला जन्माचा गाव सोडून तो एका नवीन गावात स्थाईक होण्यासाठी जात होता.... कशासाठी?आपल्या पोराला चांगलं शिक्षण द्यायचं, या ध्येय्यानं त्याला झपाटलं होतं. त्यानं पोराच्या चेहऱ्याकड पाहिलं. तो स्वतःलाच पुटपुटला "बाळा.. तुला मी लय साळा शिकवीन... मोठा सायेब करीन... "

( माझ्या 'अकस्मात' कथेतून )
पुस्तकाच्या स्वरूपात लवकरच...