Saturday, February 29, 2020

अकस्मात

काही दिवस असेच गेले. एका आठवड्याने रघूने रखमाच्या भावाला फोन केला. पुण्याला जाण्याचं निश्चित झालं. सकाळचे सात-साडेसात वाजले असतील. रघूने आपली पिशवी भरली, भिंतीवरचा बायकोचा फोटो काढून हातात घेतला.  क्षणभर फोटोकडं बघत काळजाला लावला आणि आपल्या पिशवीत ठेवला. दुपारच्या शिदोरीचं गाठोड पिशवीत घातलं. मुलाला नवीन कपडे घातले. दोघं घराबाहेर पडले. घराचा दरवाजा लावून त्यानं घराला कुलूप लावलं. एका हाताने पिशवी उचलली, दुसऱ्या हाताने मुलाचा हात पकडला. चार पावलं पुढं गेल्यानंतर त्यानं घराकडं वळून बघितलं. त्याला वाटलं घरच्या भिंतीनी, अंगणातल्या तुळशीने, कोपऱ्यातल्या चुलीने अंगणात जणू काहूर मांडला होता, त्याला अडवण्यासाठी त्या जणू साद देत होत्या. आठवण करून देत होत्या त्याला त्याच्या बायकोची. बायकोच्या आठवणी याच भिंतीच्या आत कोंडून राहतील याची रुखरुख त्याच्या मनात होती. गावाची माती सोडून जातानाची हळहळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. दररोज कामावर जाताना डबा देवून, हात वर करून निरोप देणारी बायको त्याला घरापुढं दिसत होती. त्याला पावलं जड वाटत होती. डोळ्यात पाणी तरारलं होतं. आपला जन्माचा गाव सोडून तो एका नवीन गावात स्थाईक होण्यासाठी जात होता.... कशासाठी?आपल्या पोराला चांगलं शिक्षण द्यायचं, या ध्येय्यानं त्याला झपाटलं होतं. त्यानं पोराच्या चेहऱ्याकड पाहिलं. तो स्वतःलाच पुटपुटला "बाळा.. तुला मी लय साळा शिकवीन... मोठा सायेब करीन... "

( माझ्या 'अकस्मात' कथेतून )
पुस्तकाच्या स्वरूपात लवकरच...

समुद्र


एक ८० वर्षाचा म्हातारा समुद्राच्या किनारी राहत होता. त्याच्या गावात त्याला खूप प्रतिष्ठा होती. आपलं छोटंसं घर आणि छोटीशी शेती यावर तो जाम खुश होता. तो दररोज शेतातील काम करत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत असे , परंतू समुद्राला हे पहावत नव्हत.  समुद्राला आपल्या विशालतेवर खूप गर्व होता.

एके दिवशी समुद्र त्या महाशयांना म्हणाला "तू स्वतःला खूप कर्तुत्ववान समजतोस का रे? या गावावर अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे आणि इतकंच  काय ? या जगावरदेखील अधिराज्य करण्याचा अधिकार माझा आहे ! आता मी हे गांव बुडवणार आहे आणि त्याची सुरुवात.... त्याची सुरुवात मी तुझ्यापासून करणार आहे ! मी तुला बुडवनार.. तुझी शेती, तुझं घर.. तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... तुझं कर्तुत्व बुडवनार... .. मैं समंदर हूं, समंदर ! लौटकर फीर से आऊंगा...  हा हा हा.... " असं हसत समुद्र थोडा वेळ शांत  झाला ... तो म्हातारा विचार करू लागला
तो घाबरला नाही...  खचला नाही, त्या वृद्धाचा अनुभव नेटका होता...  त्याच्याकडे कुशल बुद्धिमता होती... तो विचार करू लागला.... 

दोन दिवसांनी समुद्राला भरती आली.... समुद्र खवळला होता... समुद्र त्या महाशयांकडे आला आणि म्हणाला आता मी तुला बुडवणार... तुझं कर्तृत्व बुडवणार ... तुझी प्रत्येक गोष्ट बुडवनार... इतक्यात ते महाशय आपल्या झोपडीत गेले आणि घरातून एक वाटीभर तेल आणले आणि समुद्रात टाकले... आणि म्हणाले... "बुडवून दाखव!"

- गणेश आटकळे 
 15-12-2019