Tuesday, October 22, 2019

यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण
लेखक रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये जेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली. पहिल्या भेटीतच मी खूप भारावून गेलो. शेजवलकर सरांना अनेक जीवनगौरव पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार, व्यवस्थापन क्षेत्रातील पुरस्कार, अनेक फौंडेशनचे, बँकांचे पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. सर्वच क्षेत्रात सरांचे योगदान बहुमोल आहे. आज सरांचे वय ९२ वर्षे आहे, परंतु अनेक तरुणांना लाजवेल असे आजही त्यांचे कार्य आहे. खरं तर, आपल्या शब्दांतून डॉ. प्र. चिं. शेजळकर लिहिणे म्हणजे ओंजळीने हिमालय भिजवल्यासारखे आहे.

डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली तेव्हा त्यांचे ‘यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन’ हे पुस्तक हाती पडले.
घरी परतताच वाचायला सुरुवात केली. वाचताना शेजवलकर सर माझ्याशी जणू संवाद साधत आहेत असे काहीसे भासले. व्यवस्थापनामधील अनेक लहानमोठ्या गोष्टी या पुस्तकात अतिशय विस्तारित रूपाने  मांडल्या आहेत, बरोबरच सामान्य माणूस उद्योगधंद्यात का मागे पडतो आणि उद्योगधंद्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, हे शेजवलकरांनी अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. यशस्वी व्यवस्थापनासाठी आपले मुलभूत विचार काय असायला हवेत? आपल्या जीवनात व्यवस्थापनेची महती कितपत योगदानाची आहे? खरे तर,  व्यवस्थापन हे कोणते विज्ञान किंवा तंत्रज्ञान नसून एक कौशल्य आहे, त्याला नियोजनाची आणि संयोजनाची जोड असावी लागते. आपल्या कार्याक्षतेच्या जोडीला नीटनीटकेपणा असायला हवा. आपल्या अपयशाला कधी आपले अपुरे ज्ञानही कारणीभूत असते, त्यासाठी अनुभवातून आलेल्या माहिती बरोबर इतर माहिती ज्ञात करून घेणे, हे या पातळीपर्यंत कि आपल्या कार्यासंबधी कोणताही प्रश्न विचारला असता तोंडून कधी ‘मला माहित नाही’ असे उत्तर यायला नको. पुस्तकात अशा गोष्टीवर सोप्या शब्दांत भाष्य केले आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच ढोंगीपणा, गाफिलपणा किंबहुना लाचारी किती पसरली आहे हे सांगितले आहे..

पगार वाढतोय, काम घोरतंय, थापेबाजीला ऊत येतोय..
अर्धवट शहाणपणापुढे जग मान तुकवतंय...
आत्मस्तुतीत गुरफटले आहेत अहंकारी बुद्धिवंत !
ढोंगीबाजी करतंय उथळ नेतृत्व,
निर्लज्ज करताहेत अतोनात उपद्व्याप...
अधिकारी झाले आहेत बहिरे, अनुयायी झाले आहेत ‘होयबारे’
बहुसंख्य बसले आहेत डोळ्यावर कातडे पांघरून
तज्ञ आहेत पण क्रियाशून्य !
येते संधी ... आणि जाते निघून....


या सर्व गोष्टींबरोबर वेळेचेही  महत्व या पुस्तकात पटवून दिले आहे. आपला वागणुकीतील शिष्टाचार, तारताम्यता, आपला आत्मविश्वास, सभोवतालचे वातावरण, आरोग्य, आहार  या गोष्टीवर देखील या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. ईच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो हे उदाहरणासह स्पष्ट केले आहे, गाथा उद्योजकतेची वाचताना आपला आत्मविश्वास वाढला नाही, तरच नवल! दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संभाषणापासून त्यांच्यात होणारा पैशाच्या व्यवहार कसा करावा याचेही छान वर्णन केले आहे. हाताखालच्या माणसांकडून कामे कशी करून घ्यावी? सुसंवाद कसा साधावा ? किंबहुना समोरच्या व्यक्तीचे लक्षपूर्वक कसे ऐकावे ? पैसा खर्च करण्याची कला कशी अवगत करावी ? मराठी माणूस उद्योगात मागे का ? पात्रता असूनही यश का मिळत नाही?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटत असतात परंतु आपल्या यशस्वी जीवनासाठी त्या खूप महत्वाच्या असतात. रागावण्याची वेळ आली कि आपली होणारी हतबलता आणि आपण  त्यावेळी काय केले पाहिजे कसे वागले पाहिजे ? शिस्तीची आधुनिक संकल्पनाही शेजळकरांनी अगदी सोप्या शब्दांत मांडली आहे.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपली चिकाटी, धडपड बरोबरच आपली दूरदृष्टीही महत्वाची असते. व्यवस्थापकीय प्रश्नांचा केंद्रबिंदू शेवटी आपण सर्व माणसेच असतो. आपले अनुभव, विचार करण्याचे कौशल्य, निर्णय कौशल्य या सर्व गोष्टी शिकणे... यश मिळवण्यासाठी गरजेच्या ठरतात. निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचे निर्णय घेतलेले अधिक बरे... कारण चुकीचे निर्णय घेणाऱ्या माणसांनीही जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णय घेवू शकत नाही, ज्याचे मन नेहमी गोंधळात असते, असा मनुष्य कधीच यशस्वी झालेला आपण ऐकले नाही, अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

माणसाने कसे असावे? कसे नसावे ? काटकसर कोठे करावी ? बोलताना, ऐकताना संयम राखावा, सहकाऱ्याला विश्वासात घेवून सहकाऱ्यांची चूक कशी लक्षात आणून द्यावी अशा अनेक गोष्टीवर शेजळकरांनी वाचकांशी संवाद साधला आहे.  कोणताही माणूस त्याच्या जीवनात किंवा व्यवसायात यशस्वी कसा होतो हे शोधणे थोडेसे कठीण जरी असले तरी त्यामागचे रहस्य माहिती करू घेणे गरजेचे असते. ‘Action speaks louder than words’  हे समीकरणही अगदी खरे आहे. मी ठामपणे सांगतो कि ज्याला यशस्वी होण्याकरता आपल्या जीवनाचे अचूक व्यवस्थापन करायचे असेल अशा प्रत्यकाने हे पुस्तक आवरजून वाचावे.