Friday, July 26, 2019

रायरेश्वराचा खंजीर आणि मायावी आरसा

या कथेचे प्रकाशक किंवा लेखिका माझ्या ओळखीच्या नाहीत. सहज चपराकच्या कार्यालयात गेल्यानंतर हे पुस्तक हाती पडलं. घरी आल्यावर पुस्तक वाचलं, आवडलं आणि मग समीक्षण करावसं वाटलं,  म्हणून लिहितोय!

मी ९० च्या दशकात आपण दूरदर्शनवर अनेक राजा-महाराजांचा काल्पनिक संग्राम पहिला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही अशा अनेक मालिका पाहायचो,  जसे कि अलिफ-लैला, चंद्रकांता, अलीबाबा चाळीस चोर.  हे पाहताना आमच्या डोळ्याची पापणी देखील पडत नव्हती, अशी उत्कंठा त्या मालिकांमध्ये होती. अगदी तशीच 'रायरेश्वराचा खंजीर आणि मायावी आरसा' ही कादंबरी वाटली.  ही कादंबरी ११ कथांमध्ये विभागली आहे.  एखादया सिनेमामध्ये आधीचा पूर्वार्ध संपल्यानंतर नायकाला किंवा नायिकेला भूतकाळातील जीवन कसे आठवते आणि त्याचा सध्याच्या थरारकतेशी कसा संबंध असतो.. अशा पद्धतीने याचं लेखण झाले आहे आणि हे वाचताना आपल्याला कथेतील गूढ जाणून घेण्याची उत्कंठा वाढली नाही तरच नवल. 

सुरुवातीला रायरीच साम्राज्य वर्णन करत एका अमावशेची रात्र आणि त्यात कालीच रायरीवर झालेलं आक्रमण अतिशय थरारक पद्धतीनं मांडलं आहे. काली हा रायरी गावचाच रहिवाशी, कपटी तांत्रिक आपले वेगळे सैन्य अर्थात कोल्ह्यांसारख्या जंगली प्राण्याचे सैन्य तो कसे उभा करतो. भैरवी आणि काशिनाथला पुत्रप्राप्ती होत नसते, कालांतराने मग एका मायावी पद्धतीनं त्यांना पुत्रप्राप्ती होते.  म्हणजेच कालीचा जन्म होतो.  यात भैरवीला मानवतेची आणि मातृत्वाची कठीण परीक्षा द्यावी लागते. या सर्व रहस्यामध्ये भैरवीकडून चुकून रायरीची  राजमाता यांचा प्राण जातो आणि तिथून पुढे भैरवीला अनेक बळी द्यावे लागतात, हे वाचताना वाचकाच्या असहायी व्यक्तीबद्दलच्या भावना जाग्या होतात.

पुढे त्र्यंबकला काली नाव कसे मिळाले ?  कालीच्या जन्माबद्दलचे जसे रहस्य आहे तसेच त्याच्या मृत्यूबद्दलही आहे. हे सर्व वाचताना उत्कंठा वाढते.

कालीचा मृत्यू मिळवण्यासाठी दिव्याचा आणि सोहमचा संघर्ष आणि त्यात खंजीर आणि मायावी आरशाचा सहभाग, तीन राक्षसांशी सोहमनी दिलेला लढा, भुलभुलय्याची सफर या सर्व गोष्टी कथेतील गूढता वाढवतात आणि त्यातील थरारकता मांडण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. वाचताना मध्येच येणाऱ्या कवितेच्या ओळी सिनेमातील भावनिक गीतांची जाणीव करून देतात.

निर्वाणीचं युद्ध सुरेखपद्धतीनं मांडलं आहे. कलीचा मृत्यू झाल्यानंतर सोहमचाही मृत्यू होतो आणि तो क्षण वाचकांना आणखी भावनिक बनवतो. राजपुरोहित, विश्वास, दिव्या, सोहम, महाराज माधव, महाराणी नंदिनी, आशा, काकू आणि इतर सर्व पत्रे लेखिकेने खूप छान पद्धतीने रंगवली आहेत.  ज्यांनी ९० च्या दशकातील अलीबाबा चाळीस चोर, अलिफ लैला अशा सीरिअल्स बघितल्या नाहीत, अशा वाचकांनी ही कादंबरी जरूर वाचावी.

लेखिका : जयश्री भोसले 
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन  
किंमत : १०० रुपये. 
कादंबरी मिळवण्यासाठी लिंक :
 https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5704387453920009520