Monday, April 8, 2019

एथिकल हॅकिंग म्हणजे काय ?

बदलत्या दिवासंबरोबर नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे आणि ते तंत्रज्ञान सुरक्षित हाताळणे आज गरजेचे आहे. हॅकिंग हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल. कुणाचंतरी ईमेल खातं, फेसबूक खातं, बँक खातं हॅक झालेलंही ऐकलं असेल. सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अलीकडच्या काही तरुणांना हॅकिंगचे कोर्सेस करण्याची भुरळ पडलेली आहे. अर्थात त्यांना एथिकल हॅकर म्हणून आपले करिअर घडवायचे असते. हॅकिंग जर गुन्हा असेल, तर मग एथिकल हॅकिंग का नाही? आपल्याला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट, संगणक आणि मोबाईल वापराचे प्रमाण वाढले असल्याने आपणास एथिकल हॅकिंगबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

खरं तर, एखादा व्यक्ती इंटरनेटवरील एखादं खातं हॅक करतो म्हणजे गुन्हा करतो का ? काही प्रमाणात याचं उत्तर होकारार्थी आहे. परंतु, हॅकर कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या परिस्थितीत हे काम करत आहे, यावरून तो गुन्हेगार ठरतो. अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी हॅकरची भावना काय असते. जर हॅकरने एखाद्या बँकेची वेबसाईट हॅक करून एखाद्याची खाजगी माहिती चोरणे, त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेणे, क्रेडिट कार्डचे तपशील चोरणे, इमेल, फेसबुक, ट्वीटर खाती हॅक करून बदनामीकारक मेसेज पाठवणे, अशा सर्व प्रकारच्या हॅकिंगकडे गुन्ह्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हॅकिंगमध्ये जर असे वाईट प्रकार मोडत असतील तर हॅकिंगमुळे कोणाचं भलं कसं होऊ शकतं ? असाही प्रश्न पुढे उभा राहतो. अर्थात असे प्रकार थांबवण्यासाठी, आपली सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले होऊच नये आणि ते झाले, तर त्या हल्ल्यामधून सावरण्यासाठी म्हणून योग्य उपाय योजना करता येतात यालाच 'एथिकल हॅकिंग' म्हणतात, अर्थात ही एक नैतिक प्रक्रिया आहे. सुरक्षितता भेद्यता शोधण्यासाठी किंवा त्या निराकरण करण्याच्या हेतूने नेटवर्क आणि संगणकामध्ये, इंटरनेट खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी संस्थाद्वारे नैतिक हॅकर्स नियुक्त केले जातात. अर्थात  'एथिकल हॅकिंग'  हा एक कायदा म्हणूनही पुढे आला आहे. 

समजा, एखाद्या बँकेचं सॉफ्टवेअर ग्राहकांसाठी इंटरनेटवर खुलं करण्यासाठी, सॉफ्टवेअरला बऱ्याच चाचण्या पार पाडणे गरजेचं असतं. बँक या तपासण्यांचे काम एथिकल हॅकर्सला देत असते. अर्थात, बँक आपलेच सॉफ्टवेअर हॅक होत नाही ना? याची पडताळणी करत असते.  त्यातूनच आपले सॉफ्टवेअर इंटरनेटवरून सर्वांना उपलब्ध करून देण्यापूर्वीच बँक त्यामधले धोके काढून टाकण्यासाठीच्या आणि माहिती सुरक्षित राहील याची खात्री बाळगण्यासाठीच्या अनेक उपाययोजना करू शकते. एथिकल हॅकर्स हे गुन्हेगार पकडण्याच्या कामात मोलाचे काम करतात. सरकारी आणि खाजगी कंपन्यांकडे असे अनेक एथिकल हॅकर्स कार्यरत असतात. इंटरनेटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, सरकारची बदनामी होऊ नये, इंटरनेटवरील सरकारी किंवा कंपन्यांच्या माहितीवर सायबर हल्ले होऊ नयेत यासाठीची पूर्वतयारी एथिकल हॅकर करत असतो.  इंटरनेटवरून माहिती चोरणारा किंवा गुन्हा करणारा हॅकर पकडण्यासाठीचे काम देखील एथिकल हॅकर्स करत असतात. 

एथिकल हॅकिंग क्षेत्रातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एथिकल हॅकर्सला हॅकिंगकेंद्रित खाजगी स्वरूपाच्या गोष्टींमध्ये किंवा त्यातील महत्वाच्या बाबींबद्दल माहिती असणे गरजेचे असते, जसे की, बँकिंगची माहिती, काहीप्रमाणात गुन्हेगाराची माहिती, इ. कायदेशीर हॅकिंग करत असताना चुकूनही आपल्या हातून गुन्ह्याअंतर्गत नोंदला जाणारा प्रकार घडू नये याचीही काळजी एथिकल हॅकर्सला घेणे गरजेचे असते अर्थातच एथिकल हॅकिंग हा विषय सायबर सिक्युरिटीअंतर्गत येतो.

अर्थात डिजिटल इंडिया साकारत असताना सर्व सरकारी उपाययोजनांचे काम इंटरनेटवरून उपलब्ध करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. म्हणूनच भविष्यात एथिकल हॅकर्सची मागणी आणखी वाढणार आहे. ज्यांना या विषयामध्ये करिअर घडवायचे आहे, त्यांनी आधी कॉम्पुटर नेटवर्क, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमध्ये कौशल्यधारक असणे गरजेचे आहे. ज्या लोकांना अशा प्रकारची आव्हानं आवडतात आणि वेगवेगळी सॉफ्टवेअर टूल्स वापरून, शक्कल लढवून, कल्पना करून सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे किंवा गुन्हे घडू नये यासाठीचे असे तंत्र जमेल असे वाटते त्यांना एथिकल हॅकिंगसारखे क्षेत्र निवडायला हरकत नाही. यासाठी CEH (Certified Ethical Hacker) नावाचा कोर्स आहे.  या क्षेत्रात पदवीधारक होण्यासाठी याचे कोर्सेस इंटरनेटवर उपलब्ध आहेत.  याचे शुल्क ऑनलाईनच भरावे लागते. CEH पदवी धारकांना  बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. सरकारी नोकरीत आणि खाजगी कंपनीत त्यासाठी चांगले वार्षिक पॅकेजही आहे.