Thursday, October 4, 2018

महात्मा

सत्य, अहिंसेचे मार्ग तुमचे,
पण काहींना चीड
होती पंचावन्न कोटीची,
अन त्या फाळणीची,
तर काहींना सिंधू नदीची...

चीड ती शिव्याशपापर्यंत
टकल्या, बोळक्या
अन म्हातारा म्हणण्यापर्यंत..
कोण तुम्हाला स्वीकारत राहील ...
अन बदनाम कोण करत राहील..
मारूनही तुम्हाला तुमच्या नावाने
कोण बोटं मोडत राहील..

तर दोन ऑक्टोबरला कोण
केवळ सुट्टीची मजा घेत बसेल,
तर कोण
ड्राय-डेमुळे बोम्बलत बसेल..

सत्याचे प्रयोग करत
तुम्ही कधी मुस्लीम झालात,
हिंदू कधी अन कधी ख्रिश्चनही..
अहिंसेमुळेच महात्मा तुम्ही ,
राष्ट्रपिता तर कोणासाठी बापू ,
तर तुम्ही सामान्य अजून मोहनही..

धन्य झाली भारतभूमी,
आलात तुम्ही चलनावर...
कारण जगालाच जायचे आहे
आज अहिंसेच्या वाटेवर...

आजही असाच
आम्ही जगत, वाचत, लिहीत
एक महात्मा जाणतो...
विदारक सत्य हे कि,
आजही अनेकदा
राजघाटवर नथुराम येतो....

- गणेश.