Sunday, October 14, 2018

शिक्षणाचे वैदिकीकरण होतेय !

या ४-५ वर्षात जे सामाजीक, राजकीय आणि शैक्षणीय वातावरण ढवळून निघत आहे, ते लक्षणीय आहे. शैक्षणीय बाबतीत बोलायचे झाले तर, आवडीचं शिक्षण घेत असताना प्रत्येक्षिकं करावीत आणि त्यातून अनुभव घ्यावा, मग त्यावरच काम करत दांडगा अनुभव घेत जावा आणि असा दांडगा अनुभव जेव्हा येतो आणि जगाला याचे फायदे दिसू लागतात तेव्हाच ते शिक्षण सार्थ ठरते, असे जर होत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ गेलेले असते म्हणजे तोपर्यंत आपण अडाणीच असतो.  शिक्षणातून आपले ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव आणखी वाढत जात असतो. संगणकक्रांतीने आज तर जगाचे दरवाजे कधी नव्हे एवढे खुले झाले. यामुळे तरी भारतीयांची विचारपद्धती व्यापक, वैश्विक बनायला हवी होती. परंतू चित्र उलटेच दिसत आहे. खरं तर, ज्ञान हे जसं निरंतर पवित्र आहे, इतकंच राज्याच्या आणि देशाच्या शिक्षण विभागानेही त्याचं पावित्र्य राखायला हवे. परंतू आज शिक्षण विभागाकडून कामातून जे चित्र पाहायला मिळत आहे, ते निंदनीय आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध असलेल्या इंजिनीरिंग कॉलेजमध्ये सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम पार पडला, जिथं असा कार्यक्रम अपेक्षित होता कि ज्यामध्ये अंधश्रधा निर्मूलानाचा प्रसार होऊन विद्यार्थी कसे विज्ञानात संशोधक बनतील आणि राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक करतील. 

सरकारने शिक्षण महासंचालयाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पुण्याच्या शाळा-कॉलेजामधून भगवतगीता हा हिंदू ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट देण्याची मोहीम हाती घेत असल्याचे सांगितले होते. विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतरही सरकारने हा निर्णय मागे घेतलेला नाही. प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या अभ्यासाच्या  पुस्तकातील आज ज्या चुका समोर येत आहेत, त्याही चुका एखाद्या विशिष्ठ वर्गाला उच्च ठरवण्यासाठी होत्या कि काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्याच आहेत. आजचा विद्यार्थी उद्याचा मतदार असतो. असे चुकीचे शिक्षण लादून स्वतःचे सरकार निरंतर टिकण्याचा हा प्रयत्न आहे काय? असाही प्रश्न पुढे उभा राहतो.  

चार-पाच वर्षात  शिक्षणातूनच विज्ञानवाद डावलला जात असून धर्मवाद कसा श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नव्हे तर AICTE (All India Council for Technical Education) अंतर्गत असेलेल्या इंजिनीरिंगच्या अभ्यासात पर्यावरणाबरोबर पुराणाचा, वेदांचा अभ्यासक्रमही असेल, २०१८च्या सुरुवातीला अशी धक्कादायक घोषणा खुद्द प्रकाश जावडेकरांनी केलेली आहे. जग तंत्रज्ञानाने बदलत आहे. जगभरात खूप वैज्ञानिक संशोधन झालेले आहे आणि ते आजही होत आहे , परंतू त्यात भारतीय संशोधक किती आहेत? अगदी बोटावर मोजण्या इतकेच! खरे तर, हे प्रमाण शिक्षण विभागानेच वाढवले पाहिजे, तशी रणनीती आखली पाहिजे. आज 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज', बिग डेटा, रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या गोष्टीमधून दुनिया बदलत आहे. परंतू भारतात शासकीय खर्चाने गोमुत्रावर संशोधन करणे असे हास्यस्पद प्रकार या काही वर्षापासून सुरु आहेत आणि आजचे सरकार मात्र शिक्षणातूनच धर्मवाद आणखी कट्टर करू पाहत आहे. अर्थात शिक्षणाचे वैदकीकरण होत आहे,असे म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व प्रकार देशाला जातीवादाकडे घेवून जात आहे.

AICTE च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ३००० इंजिनीरिंग कॉलेजेस मधून ७०००० इंजिनिअर्स बाहेर बडतात, परंतू त्यातल्या साधारणतः निम्म्याच  इंजिनिअर्सन्ना नोकऱ्या मिळतात.  बेरोजगारी प्रश्न सोडवण्याचा सोडून सरकार विद्यार्थ्यांची आहे ती बुद्धी धर्मवादाकडे वळवत आहे. मुळात शिक्षण विभागाने कोणताही धर्म अथवा विशिष्ट सांप्रदायिक विचारसरणीचा शिक्षणांतर्गत आणि शिक्षण बाह्य प्रसार करणे हे सर्वथा चुकीचे आणि  अनैतिक आहे याचे भानही सरकारला राहिलेले नाही. आणि यातूनच भविष्यात आणखी संकटं निर्माण होतील, अंतरराष्ट्रीय स्तरावर  देशाच्या शिक्षण पद्धतीचे हसे होईल, अशी चिंता जागृक नागरिकांना वाटणे साहजिक आहे.

आपल्या शिक्षण पद्धतीतून कसे संशोधक तयार होतील? कसे नवनवीन  व्यवसाय तयार होतील? नोकारदार तयार करताना नव्या नोकऱ्या कश्या निर्माण होतील? शिक्षण महासंचालयाने कोणताही धार्मिक स्पर्श न करता ज्ञानाचे पावित्र्य राखत अशा प्रश्नांचे निरसन करण्याची वादळे घडवून आणावीत. तेव्हाच देशाची शिक्षणपद्धती सदृढ आणि त्रुटीहीन झालेली असेल.