Thursday, September 20, 2018

कवीवर्ग बदनाम का होतोय ?

कविता ही शब्दांच्या गाठोड्यापेक्षा भावना मांडणारी प्रक्रिया अधिक असते. त्यामुळे कवितेतून दृश्य पावणारे  तिचे रूप हा स्वतःबद्दल किंवा समाजाबद्दल आपले विचार दर्शवणारा प्रक्रियेतीलच एक भाग ठरतो. माझ्या मते, ‘कविता लिहिणे’ हा कसला उद्योग किंवा उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही. कोणता करिअरमार्गही होऊ शकत नाही.  समाजप्रबोधनासाठी कविता हे प्रभावी माध्यम आहे. कविता जगणं मांडते किंबहुना जगायला शिकवते. कविता वर्चस्वदावर प्रहार करून विद्रोह करते. कविता भावना व्यक्त करते. कवीच्या स्वभावानुसार किंवा जगण्यानूसार प्रेम कविता, विरह कविता, निसर्गावरच्या कविता, विद्रोही कविता  फुलत जातात वाचणाऱ्याच्या, ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडतात. ज्या कविताचे आशय काळजाला भिडतात, वास्तव मांडतात किंवा अन्यायावर वार करतात,  त्या कविता खरोखर अजरामर राहतात आणि अशाच कवीला समाज स्वीकारतो.  कविता कागदावर येण्यासाठी रोजचे भावनामय आयुष्य, संघर्षाने भरलेले आयुष्य म्हणजेच सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे इथे महत्त्वाचे ठरते. जेव्हा जगणं आणि लिहिणं एकजीव होतं तेव्हाच तुकाराम आणि कबीर जन्म घेतात.


जिवंत माणसाची काही ठरलेली स्वप्नं असतात, त्याबद्दलच्या भावना असतात. हेच शब्दातून सांगणाऱ्या रचनेला आपण कविता म्हणू शकतो. कविता हे निव्वळ भाष्य नाही. 'स्व'ला भेदणारा आणि अहंकाराला प्रत्येक क्षणी सुरुंग लावणारा कधी स्वतःशी, जवळच्या व्यक्तीशी, समाजाशी केलेला तो संवाद असतो. ज्यातून समाजही बदलून जातो. म्हणूनच काही कविता हसायला लावतात, काही रडायला तर काही विचार करायला भाग पडतात.


बहिणाबाई अशिक्षित होत्या. त्यांच्या जगण्यातून त्यांना जे सुचलं, त्यांनी ते मुलगा सोपानला कागदावर लिहायला सांगितलं.  अशा अनेक महान कवींची, कवयत्रीची देणगी भारताला लाभली आहे. आणि ही परंपरा पुढे चालवणे आपली जबाबदारी आहे. याकरता काळाच्या वेगवेगळ्या संदर्भांसकट आयुष्यभर जगणे कवितेसाठी जसे दर्द भरे  ठरते तसे  त्यामुळे कविता हा स्वभाव असणाऱ्याला कुठल्याही एका संकल्पनेला चिकटून न राहता सतत प्रवाही असणे गरजेचं असते.


आजही कविता लिहिणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे आणि ते असायलाही पाहिजे, परंतु आजच्या काही कवींची अवस्था विनोदात्मक झाली आहे. कवितेचा स्तर खालावला आहे. कविता म्हणजे केवळ चार-पाच ओळी जुळवल्या आणि काही यमक शब्दांची भर घातली कि कविता बनते असे नाही. कवी जेव्हा अशी कविता रसिकाला ऐकवायला जातो. आपुलकीच्या नात्याने किंवा मैत्रीखातर तो रसिक एक-दोन कविता ऐकूनही घेतो, परंतु जेव्हा अशाच कविता वारंवार बनल्या जातात आणि ऐकवल्या जातात, तेव्हा तो कवी बदनाम झालेला असतो आणि तो अखंड कवीवर्गाला लागलेला कलंक ठरतो,  म्हणूनच आजच्या काळात कवीवर्ग असाच बदनाम ठरला जातोय. याच कारणांमुळेच कवीची टिंगल होते आणि कवितेचे हासे होते.

Published in Dainik Surajya, Solapur. 26 Sept 18.