Sunday, September 9, 2018

खरं तर! असं घडलं!

        होस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप उशिरा जेवायला जायचा, उशीराच झोपायचा. होस्टेलवरही लोडशेडींगमुळं लाईट जायची. लाईट जाऊ नये म्हणून आम्ही होस्टेलच्या रेक्टरकडे वेळोवेळी तक्रारही केली होती. लाईट गेल्यावर आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, मोठ्या आवाजात गाणी म्हणायचो, पंजा फाईट खेळायचो. एकदा असंच पंजा फाईट खेळताना जास्त गोंधळ झाला होता, गोंधळावरून होस्टेलमागे राहणाऱ्या तिथल्या लोकल मुलांनी महाराष्ट्राबाहेरील मुलांची रॅगिंगही घेतली होती.  रात्रीचे दोन-तीन वाजल्याचे भानसुद्धा आम्हाला राहत नसत. मी आणि अभिजित वांढेकर एका रूममध्ये राहत होतो. तर एका बाजूच्या रुममध्ये अजिंक्य स्वामी आणि विल्यम फर्नांडीस हे दोघेही कोल्हापूरचे. आणि दुसऱ्या बाजूच्या रुममध्ये साताऱ्याचा मयूर केंजळे आणि पुण्याचा विक्रांत पिटके. वरच्या मजल्यावरून सातारचा अमरजित यवतकर अधून-मधून आमच्या ग्रुपमध्ये यायचा. आम्ही अभिजित वांढेकरला वांड्या म्हणायचो, विक्रांत पिटकेला पिटक्या, विल्यमला विल्ल्या, अमरजीतला आमऱ्या आणि मयूरला मयऱ्या! अशी अजब नावं आमच्या मुखी असायची. माझं बारावीपर्यंत सगळ शिक्षण पंढरपूरला झालं होत. इंजिनीअरिंगसाठी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवा परिसर अगदी मजेचे दिवस चालले होते. कॉलेज सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो तर शनिवार-रविवार गाठून कधी कोल्हापूरचा परिवार फिरायला जायचो. कधी रंकाळा, कधी ज्योतिबा, पन्हाळा तर कधी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला. बाकीच्या मुलांचेही ग्रुप बनले होते. कुणाचे ग्रुप ज्यांच्या-त्यांच्या गावांप्रमाणे तर कुणाचे इंजिनीअरिंगच्या ब्रांचप्रमाणे. पण आमच्या ग्रुपमध्ये असं काहीही नव्हतं. ग्रुप कसला! वेड्यांचा बाजार नुस्ता! माझ्या कॉलेजलाईफमधला एकही दिवस असा गेला नाही कि मी वांड्याची अक्कल काढली नाही. बरोबर अजिंक्य, विल्ल्या , मयऱ्या, पिटक्या मजा घ्यायला असतच. पण वांड्या कधी चिडायचा नाही, कारण वांड्या चिडला की आमच्या चेहऱ्यावर भलताच राक्षसी आंनंद चढायचा. मग कधी आम्ही पुण्याचे पिटके महाशय, तर कधी मयऱ्याकडे वळायचो, असा एकामागून एकाचा पोपट करायचा आणि खिदळत बसायचं. अधूनमधून कुणी आपले किस्से सांगत असत. आमची पहिली सेमिश्टर अशीच मजा करत संपली होती. बऱ्याच जणांचे विषय राहिले होते. कुणाचा मॅथ्स-एक, कुणाचा ग्राफिक्स, कुणाचा फिजिक्स वगैरे, वगैरे. कॉलेजच सबमिशन जवळ आलं होतं. होस्टेलवर सगळी पोरं एकमेंकांच जर्नल्स घेवून सबमिशन पूर्ण करत होती. ड्रॉईंगचा आभ्यास करत असताना मयऱ्याने वांड्याला टोमणा मारला "प्लँचेटवर वाटी जशी फिरते तसं ड्रॉईंग काढतोयस रे...." "असू दे, काढू डे कसं तरी... ग्राफिक्समध्ये पास होणं महत्वाचं आहे." म्हणत वांड्याने स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करत ड्रॉईंग चालू ठेवलं. माझ्या शीटवर मारलेली रेघ मी अर्ध्यावर सोडत वरती पाहिलं आणि मयऱ्याला विचारलं "हा काय प्रकार असतो?" "आ...रे तो आत्म्याचा प्रकार आहे, भविष्यात काय होणार आहे ते समजतं त्याने...! जावू दे, तू आभ्यास कर."
"खरं की काय?" मी कुतूहलतेने विचारलं. इतक्यात  "हो आम्ही अकरावी-बारावीला करायचो प्लँचेट!" असं म्हणत दारात जर्नल मागायला अजिंक्य आला.
"म्हणजे तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय होणार आहे ते कळायचं?"
"हो, आणि आत्मा सांगतो ते."
"आता मी हसू कि रडू काय कळेना यार, काहीही फेक ह.. साफ खोटं!" मी हसत हाताला हिसका देत म्हणालो. अजिंक्य म्हणाला "आरे माझ्याबद्दलच्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत! मला याचा अनुभव आहे. आणि मीही प्लँचेट करायचं शिकतोयसुद्धा. मला जमायलाही लागलंय."
"आरं तर मग चल कि लेकाच्या आपण पास होतो कि नाही ते बघुयात."
"आसं नाही करता येत ते, त्याला शांतता लागते, अंधार लागतो, मेणबत्त्या लागतात, त्याला आमवश्या किंवा पौर्णिमा लागते आणि त्याचे आणखी बरेच नियमपण आहेत." आता मात्र वांड्याने मान वर केली आणि म्हणाला "हे असलं काही करायचं नाही ह... हे सगळं थोथांड असतं. अंधश्रद्धा आहे ही! आरे सायन्स कुठं पोहचलं आहे आणि तुम्ही असले-कसले प्रकार करताहात."
"तुझ्या घरावरून न्यूटन-आईनस्टाईनचं विमान गेलंय कि काय रे? करून तर बघुयात न. आपण पास होतोय का नाही ते समजेल तरी!"
"काही नाही रे, वांड्या. सब झुठ है!" विल्ल्याने वांड्याला कोरस दिली.
"आता हे ब..घा... दि ग्रेट सायंटिस्ट मिस्टर विलियम फर्नांडीस!" मी विल्ल्याला टोमणा मारला.
"अरे माझं मत काही नाहीरे, पण तुम्हाला करायचं आहे तर करा..." पुन्हा विल्ल्या म्हणाला.
"ठरलं तर प्लँचेट करायचं!" मी प्रॅक्टिसची शीट गुंडाळून ठेवली आणि आणि आमवश्या किंवा पौर्णिमा कधी आहे ते पाहिलं. त्याच रात्रीच्या अडीचपासूनच आमवश्या सुरु होणार होती. अजिंक्यने प्लँचेटची तयारी करायला सुरुवात केली. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील. त्याने एक मोठे शीट घेतले त्यावर त्याने एका बाजूला मोठ्या अक्षरात इंग्लिशमध्ये 'येस' आणि दुसऱ्या बाजूला 'नो' लिहिले, शीटच्यामध्ये ए टू झेड लेटर्स, शून्य ते नऊ अंक काढले. लोड शेडींगमुळं लाईट जायची त्यामुळं आमच्याकडं मेणबत्त्याही होत्या, त्याने ती शीट पसरून त्यावर तीन-चार मेणबत्त्या प्रेत्येक कोपऱ्यात लावल्या. आम्ही हे सगळं डोळे वटारून पाहत होतो. अजिंक्यने सगळ्यांचे मोबाईल बंद करायला सांगितले, ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि दरवाजा बंद करणार इतक्यात वरच्या मजल्यावरचा आमऱ्या फिजिक्सच जर्नल मागण्यासाठी आला. दरवाजा लावणाऱ्यापूर्वी त्यानेही आत येण्याचा हट्ट धरला, हे सगळं काय चालू आहे हे पाहण्याची त्याची कुतुहलता होती. घाईत मी अमऱ्याला रूममध्ये ओढला आणि अजिंक्यने दरवाजा बंद केला.

             मी, विल्ल्या, मयऱ्या, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या असे एका रूममध्ये होतो. पुन्हा एकदा नियम समजावून सांगितले. अजिंक्यने पुन्हा एकदा अतिशय शांतता राखण्यास विनंती केली. त्याने खिडकीवर चादर टाकली. लाईट बंद केली. आणि सर्व मेणबत्त्या पेटवल्या. शीटवर एक वाटी पालथी करून ठेवली. चौघांना वाटीवर बोट ठेवण्यास सांगितले आणि म्हणाला "वाटी हलायला सुरु झाली की समजायचं आपल्या प्रश्नांची उत्तर दयायला आत्मा आला आहे." मी, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या आम्ही वाटीला बोटाने स्पर्श करून पाहू लागलो. परंतु त्याने सगळ्यांना डोळे मीटण्यास सांगितले. आणि तो स्वतः संस्कृतमध्ये काहीतरी पुटपुटू लागला. मंत्राचा आवाज ऐकताच वांड्या ओरडला "ए..... बंद करा हे सगळं... काय चालवलय हे...? मला भीती वाटायला लागलीय.. अजिंक्य, आमऱ्याच्या आधी मला फिजिक्सच जर्नल दे, मला सबमिशन पूर्ण करायचं आहे!  लाईट ऑन करा पहिलं!" आणि त्यान उठून लाईट चालू केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. "अरे वांड्या, हे अर्धा तास तर करायचं आहे आपल्याला! बघुयात रे आपण, अजिंक्य कसा आत्मा  बोलावतो ते, आजून ते आलेलाही नाही." मी वांड्याला समजावण्याचा, त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु विल्ल्याच्याही अंगात पुन्हा विज्ञानाच भूत नाचू लागलं. तो म्हणाला "लेकाच्यानो, विज्ञानाने आजवर किती शोध लावले, तेच शिकायला आपण इंजिनीरिंगला एडमिशन घेतलंय न? राईटबंधूच्या विमानाचा शोध, एडिसनचा दिवा, ग्राहम बेलचा फोन असे काहीतरी संशोधन करा रे.. ही काय फालतुगिरी लावली आहे. विज्ञानामुळे माणूस वेगवेगळ्या ग्रहावर जावून आला, समोर कोणतीही क्नेक्टीविटी दिसत नसताना हजारो मैलावर असणाऱ्या माणसाला आपण बोलू शकतो, पाहू शकतो." हे ऐकत आमऱ्या पुढं आला आणि म्हणाला "वांडया म्हणतो ते खरंय.. मी वेगवेगळ्या ग्रहावर जाणारय, खगोलशास्त्रज्ञाप्रमाणे चंद्र, तारे पाहणारय. हे असल्या फालतू उद्योगांसाठी आमवशेची, पौर्णिमेची वाट नाही पाहणार, संशोधनासाठी वाट पाहणार.! चला रे आभ्यास करू, माझही फिजिक्सच सबमिशन बाकी आहे."  मी म्हणालो "येह... बस कर आता! मलाही माहितीय हे विज्ञान वगैरे, मीही तुमच्यातलाच एक आहे.. बाहेर काढा रे या बटाट्याला.... आत कोणी आणलं रे याला? आज आमवश्या आहे, आणि पुन्हा संधी दोन अडवडयाने किंवा महिन्याने येणार आहे. आपण फक्त प्लँचेटचा प्रयोग करून बघतोय याच्या आहारी थोडी जात आहोत." अजूनही यावर आमच्यात खूप चर्चा झाली. शेवटी प्लँचेट करण्यास वांड्या आणि सर्व तयार झाले.

            थोडावेळ मयऱ्याने आणि आमऱ्याने वांड्याला दाबून धरला. त्याला अजून थोडं समजावून जरा शांत केला. दुसरं भूत बोलवण्याच्या अगोदर त्याच्या अंगातल विज्ञानाचं भूत बाहेर काढणं गरजेच होतं. विल्ल्याचाही विरोध मावळला. विल्ल्या आणि वांड्याला आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा अजिंक्यने लाईट बंद केली, दरवाजा बंद केला. "आरे दरवाजा बंद केला तर आत्मा येणार कसा? त्याला दिसणार कसं?" आमऱ्याने मध्येच अजून खुसपट काढलं. अजिंक्य आता पुरता वैतागला होता, "यार...प्लँचेट राहू दे.. माझा मूड गेला आता...  असं करताना याला कडक नियमांचे पालन करावे लागते ... तुम्ही राव सगळी येडयाची जत्रा...!"
"नको नको... आता सगळे शांत बसतील, आपण सुरु करूयात प्लँचेट!" म्हणत मी सगळ्यांना एक शांततेची शपथ घालून लाईट बंद केली.  मी, वांडया, अजिंक्य आणि आमऱ्या पुन्हा आम्ही चौघांनी पालथ्या वाटीवर बोट ठेवलं. अजिंक्यने पुन्हा संस्कृतमध्ये मंत्र म्हणायला सुरुवात केली. पेटलेल्या मेणबत्त्याच्या उजेडात आमची तोंडंच फक्त दिसत होती. वाटी हळू-हळू हलायला लागली आणि वेगवेगळ्या अक्षरावर जावून थांबत होती. अजिंक्यच वाटी हलवत असल्याचे माझ्या लक्षात आलं. अजिंक्यने आत्मा आल्याच सांगितलं. कसला आत्मा? आता मला कळून चुकलं होतं, परीक्षेचा आभ्यास करायचा सोडून, सबमिशन करायचं सोडून आम्हाला कुठून असली दुर्बुद्धी सुचली देव जाणे. वांड्या, विल्ल्या खरा होता हे मलाही माहिती होतं पण आता जे चाललंय ते चालू द्यावं वाटलं. अजिंक्यने आत्म्यास प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू कोणाचा आत्मा आहे वगैरे वगैरे... दादा कोंडके, नथुराम गोडसे, चार्ली चापलीन अशा वेगवेगळ्या नावावर वाटी फिरून यायची. आमचे विषय निघतील काय? आम्ही पास होवू का? नोकरी लागणार का? याची गर्लफ्रेंड आहे काय? त्याची गर्लफ्रेंड आहे काय? गर्लफ्रेंड कोण? लग्न कधी होणार? आम्ही परदेशात कधी जाणार? असे ठरलेले टिपिकल प्रश्न आम्ही विचारत होतो. वांड्याचा ड्रॉईंग विषय निघेल का? मीही माझ्या मॅथ्स विषयावर प्रश्न विचारला, वाटी 'नो'कडे सरकली. आमऱ्याचा मॅथ्स विषय सुटणार का? विचारले असता वाटी  पुन्हा 'नो'कडे जाऊन थांबली. त्याच्या नोकरीबद्दल विचारल्यास वाटी सूसाईड या शब्दावर सरकत राहिली. सगळीच उत्तरं विचित्र येत होती, हे सगळं अजिंक्यच करत होता हे माझ्या लक्षात आलं होतच पण मी आता बाकीच्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्लँचेटमध्ये सहभागी होतो. आमचा सगळा मूर्खाचा बाजार संपल्यानंतर आम्ही अजिंक्यला जाम शिव्या दिल्या, त्याची होती नव्हती, तेवढी सगळी अक्कल काढली. मी, विल्ल्या, वांड्या आम्ही सगळे अजिंक्यवर जाम चिडलो. वांड्या पुन्हा पेटला "हे असले उद्योग करण्यापेक्षा अभ्यास करा, राहिलेले विषय तरी निघतील." पुन्हा एकदा त्याने विज्ञानावर आणि अंधश्रद्धेवर भलं मोठ लेक्चर झाडून दिलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. काही दिवसांनी हा प्रसंग आम्ही सगळेच कधीच विसरून गेलो होतो. आता होस्टेलवर सबमिशन आणि परीक्षेचे वारे जोरात वाहू लागले होते. पीएलच्या सुट्टी अगोदर सबमिशन संपवयाचे होते. नंतर सुट्टीत जोमाने अभ्यास करायचा होता.

            परीक्षा जवळ आली होती. राहिलेले विषय सोडवायचे होते. अभ्यासासाठी कोण लायब्ररीत, तर कोण कुठल्या झाडाखाली, कोण रूममध्येच तर कोण होस्टेलच्या गच्चीवर जात असे. आम्ही सगळे मित्र जेवढ्या जोशात क्रिकेट खेळायचो, कँटीनमध्ये गप्पा मारत बसायचो, फिरायला जायचो, पिक्चरला जायचो, होस्टेलमध्ये गाणी म्हणायचो तेवढ्याच जोमाने आभ्यासही करायचो. मे महिन्यात आमची परीक्षा असायची, सगळ्यांनी पेपर दिले, परीक्षा देवून झाली. ग्रुपमधल्या सगळ्यांना दुसऱ्या सेमिष्टरचे पेपर सोपे गले. ज्याचे पहिल्या सेमिष्टरचे विषय राहिले होते त्यांनाही पेपर सोपे गेले. परीक्षा संपली कि आम्ही चालत ज्योतीबाला जायचो, उन्हाळ्याचे दिवस असल्याने गप्पा गोष्टी करत फिरत, डोंगर-दऱ्यातल्या झाडावर चढून आंबे-जांभळ चाखायचो, होस्टेलच्या दिवसांची मजा कुछ औरच असते. जोतिबाच्याही पाया पडताना अगदी लहाण मुलासारखं आमचे सगळे विषय निघू दे असं निर्लज्जासारखं मागणं मागायचो. परीक्षेनंतरचे दोन-तीन दिवस असे घालवल्यानंतर सुट्टीला प्रत्येकजण आपआपल्या गावी गेला. काही दिवसांनी पहिल्या वर्षाचा निकाल लागला सगळे पास झाले होते. प्रत्येकानं आपापल्या गावावरून ग्रुपमधल्या प्रत्येकाला फोन करून निकाल विचारला. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्स विषय पुन्हा राहिला होता तरीही आम्हाला दुसऱ्या वर्षाला अडमिशन मिळणार होते, परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षात हा विषय काढणे गरजेच होतं तेव्हाच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं. दुसऱ्या वर्षाच अडमिशन झाल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा मॅथ्स विषयाचा अभ्यास जोमाने चालू ठेवला. पहिल्या वर्षापेक्षा दुसर वर्ष लवकर संपल्यासारखं वाटलं, मॅथ्सच जसंच्या तसं टेन्सन होतं, दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिष्टरलाही पुन्हा आमचा मॅथ्स गेला. आम्ही पुन्हा त्यात पास होऊ शकलो नाही. कधी कधी असं वाटायचं कि "काय पाप केलं आणि या गणिताच्या जाळ्यात अडकलो." बऱ्याच जणांनी गणित आणि ग्राफिक्स या सारख्या महाभयंकर विषयांनाला म्हणजेच ड्रॉईंगला वैतागून पहिल्या वर्षातच इंगीनीअरिंगच अडमिशन कॅन्सल केलं होतं. आता आमच्या पुढं मॅथ्स पास होण्यासाठी एकच परीक्षा उरली होती. ती म्हणजे दुसऱ्या वर्षाची दुसरी सेमिष्टर. आमच्यासारखीच वांड्याचीही अवस्था होती, त्याला ड्रॉईंगमध्ये पास होणे आवश्यक होतं. तो ड्रॉईंगमध्ये फारच कच्चा होता आणि आम्ही गणितामध्ये. मी आणि आमऱ्याने रेटून अभ्यास चालू केला. मी वांडयाबरोबर लायब्ररीत अभ्यासाला जायचो. त्याला थोडे मोठ्याने वाचायची सवय होती, प्रश्न वाचला कि तो दोन वेळा पुटपूटायची सवय होती. तोंडी परेक्षेला परीक्षकाने प्रश्न विचारला की उत्तर आठवण्यासाठी वांडया तोच प्रश्न पुन्हा पुटपुटायचा, त्याला अशी गजब सवय होती. एकदा तर परीक्षक म्हणाले "डोंट आस्क टू मी, आय एम अस्किंग टू यु!"

           असंच एके दिवशी रात्री लोडशेडिंगमुळे लाईट गेली होती, पिटक्या त्या दिवशी लवकर झोपला होता, उघडा होवून अगदी कुंभकर्णासारखा घोरत होता. तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून अभ्यासाला लायब्ररीत जाणार होता. वरच्या मजल्यावरून आमऱ्या आला त्यानं पिटक्याच्या रूममध्ये घुसून मेणबत्ती मागितली. त्यादिवशी माझ्या आणि इतर मित्रांच्या रूममध्ये, कोणाकडच मेणबत्ती मेणबत्ती मिळाली नाही. त्याला कसाही दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास सुरु ठेवायचा होता, गणिताचा सराव करायचा होता. शेवटी त्यानं छोट्या मशालीच्या उजेडात अभ्यास करायचं ठरवलं. मशाल बनवण्यासाठी छोटी काटकी आणली, अंधारात कापड शोधू लागला, होस्टेलच्या पॅसेज्यमध्ये  त्याला एक मळके कापड सापडलं, त्यातले अर्धे कापड त्याने फाडून काटकीच्या एका टोकाला गुंडाळलं आणि त्यावर पिटक्याच्या रूममधले खोबरेल तेल ओतून ती दिवटी पेटवून पुन्हा वरती अभ्यासाला गेला. दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावरचे आम्ही सगळे लवकर उठलो. अंघोळीसाठी रांगा लागल्या. पिटक्या बाथरूममधून लेडीजचा आखूड टॉप किंवा ब्लाऊज पिसचा जम्पर घालून आल्याचं  चित्र पाहून आम्ही खिदळून खिद्ळून हसलो. त्याचा अर्ध्यातून खालचा बनियन आमऱ्याच्या दिवटीला वापरला गेला होता. 
  
               काहीही करून आमचा अभ्यास चालू असायचा. त्यावेळीही इंजिनीअरिंगच्या फीज महाभयंकर होत्या त्यामुळं याचाही तणाव असायचा. बऱ्याच मित्रांचा हा विषय पहिल्या, दुसऱ्याच प्रयत्नात सुटला होता, त्यांचा पुढचा अभ्यास चालू असायचा. त्यामुळ बाकीच्या मित्रांची आम्हाला आता जास्त मदत होत नव्हती, तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीन गणितं सोडायचो, सराव करायचो. दुसऱ्या वर्षाचा एखादा विषय राहिला तरी चालेल पण पहिल्या वर्षाचे सगळे विषय सुटले पाहिजेत तरच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं . त्यादिशेनेच आमचा प्रयत्न चालू होता. आता आमचं दुसऱ्या वर्षाचं सबमिशन संपून परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या विषयांचे पहिले पेपर होते. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्सचा आभ्यास चांगला झाला होता. आम्ही पेपर देवून आलो, दोघांनाही पेपर सोपा गेला. माझा विषय निघेल कि नाही याबद्दल माझ्या मनात जरा शंकाच होती. आमऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने सांगत होता कि त्याचा विषय निघणार, तो पास होणार म्हणून! त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत होता. वांड्याही त्याच्या जोडीला होता, तो ड्रॉईंगमध्ये स्कोरिंग घेवून पास होणार असल्याची खात्री देत होता. माझा मात्र चेहरा पडला होता. त्यात आम्ही बाकीचे सर्व पेपर दिले. ग्रुपमधल्या सगळ्यांना पेपर सोपे गेले. मला आणि आमऱ्याला दुसऱ्या वर्षाच्या पेपरच जास्त टेन्शन नव्हतं पण त्याहीपेक्षा पहिल्या वर्षाच्या मॅथ्सचं जास्त होतं. दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यानंतर आम्ही पुन्हा ज्योतीबाला गेलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो. एक-दोन दिवसांनी सगळे आपआपल्या गावी गेले. मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला येत असे नव्हे मी कॉलेजचं सगळं टेन्शन डोक्यातून काढून सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असत, परंतु या वेळेला चित्र वेगळं होत. थोडं टेन्शन होतं. दहावी-बारावीला जितकी वाट पाहिली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी निकालाची वाट पाहत होतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमचा निकाल होता. चार जूनला माझ्या घरी मला वांड्याचा फोन आला. माझ्या भावाने फोन घेतला होता, नगरहून अभिजित बोलत असल्याचे सांगितले. मी फोन घेतला, "हं बोल वांडया!"
"आरे तुझा मॅथ्स निघाला.."
"काय सांगतो?" माझ्या चेहऱ्यावर बारीकसे हसू खुलले. "... आणि तुझा ड्रॉईंग रे?"
"हो मी जरा जास्तच स्कोर केला आहे, मलाच समजत नाहीय कसं काय ते... आमऱ्याचं कळलं का ?"
"हं त्याचा मॅथ्स निघाला का..?"
"त्यानं आत्महत्या केली, आता तो आपल्यात नाहीय.."

मी सुन्न झालो. काय बोलावे मला कळेना. माझ्या डोळ्यासमोर फक्त आमऱ्या दिसत होता. काही वेळ मी स्वप्नात असल्यासारख वाटलं. तो असं-कसं करू शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. पुढचं बोलणं सोडून दिलं आणि मी फोन तसाच ठेवून दिला. अर्धाभर तास तिथंच गुडघ्यावर बसलो. माझे डोळे भरून आले होते. माझ्या डोळ्यासमोर आम्ही आभ्यास करतानाच चित्र दिसत होतं. माझे बाबा माझ्या जवळ होते. "आरे नापासच झाला, मग काय झालं आपण पुन्हा परीक्षा देवू, इतकं  भयंकर असं का खचून जातोय? आपण गेलेला विषय पुन्हा सोडवू." मला धरून उठवत म्हणाले.

"माझा मित्र हे  जग सोडून गेला, त्यानं आत्महत्या केली." हे ऐकताच आमच्या घरातील सगळ्यांनाच वाईट वाटले. मी डोळ्यातील अश्रूंना मोकळी  वाट करून दिली.

         होऊ शकेल की आत्तापर्यंत आमऱ्या चुकला, जगाला समजायला. प्रेम, वेदना, जगणं आणि मरणं समजायला. अशी काही घाई गडबड देखील नव्हती. फक्त एक वर्ष वाया गेलं होतं. आमच्या होस्टेलवर नापास झालेली पोरं होतीच ना आमच्याबरोबर मजा-मस्ती करायला. पण तोही नेहमीच मजा-मस्ती जगण्याच्या घाईत दिसायचा. या सगळ्या कालावधीत कधी इतका अस्वस्थ दिसला नाही. तो असं काही करेन असं काही वाटलं नव्हतं. आमऱ्या त्याच्या बालपणाच्या एकटेपणातून कधी बाहेरच येऊ शकला नव्हता. लहानपणी त्याला कोणाकडूनच प्रेम मिळालं नसल्याचं कानावर पडलं होतं. त्यानं इतक्या टोकाचा निर्णय घेतला यावर विश्वास बसत नव्हता. आत्महत्या या कधीच साध्या सरळ नसतात. फार गुंतागुंतीच्या असतात. म्हणजे माणसाने आत्महत्या केली ही गौण गोष्ट नसते. त्याबरोबरच होजारो प्रश्न उभे राहतात. कोणालाही जबाबदार धरू नये म्हणून त्यानं स्वतःला संपवण्यापूर्वी चिट्टी लिहिली होती. लोक त्याला पळपुटा घोषित करतील, स्वार्थी देखील, मूर्ख देखील म्हणतील जेव्हा तो निघून गेला होता. आता त्याला काही फरक नाही पडत लोक त्याला काय म्हणतील. आता तो या दुनियेत नव्हता. तो मृत्यूनंतरच्या कथा, भूतप्रेतांमध्ये विश्वास ठेवत नव्हता. जर कोणत्या गोष्टीवर त्याचा विश्वास असेल तर ती ही की मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेन आणि समजू शकेन की त्याची दुसरी दुनिया कशी आहे?

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आम्ही अडमिशन घेतलं. पुन्हा दुसऱ्या वर्षाचेही राहिलेले विषय बरोबर होतेच. आमचा ग्रुप आमऱ्याला खूप मिस करत होता. कारण सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या फिरायला तो आमच्या बरोबर नव्हता. राहिलेल्या विषयांचा अभ्यास करायला नव्हता. आमऱ्याचा निकाल आणायला मयऱ्या आणि पिटक्या गेले होते, त्यानं निकाला अगोदरच हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळाले होते तो पासही झाला होता. माझाही अंधश्रद्धेवर काडीमात्र विश्वास नाही आणि अंधश्रद्धेच समर्थन मी कधी केलंही नाही. त्याच्या घरचा, काहीतरी कौटुंबिक प्रोब्लेम असल्याचे समजले होते. प्लँचेट ती गोष्ट खरी झाली होती की त्यानं कौटुंबिक तणावातून आत्महत्या केली? आजही आम्हा सर्वांना हा प्रश्न पडतो आणि आम्ही पुन्हा हादरून जातो. प्लँचेटची ही गोष्ट आम्हा सर्वांना थक्क करणारी होती. तेव्हापासून आम्ही प्लँचेट करण बंद केले.