Wednesday, August 22, 2018

रोबोटिक्सची दुसरी बाजू

           संगणक, इंटरनेट, वेगवेगळी सोफ्टवेअर्स, मोबाईल ऍप्स, रोबोट आणि इतर इलेक्ट्रोनिक्स उपकरणांचा होणारा वापर त्यामुळेच तंत्रज्ञानामध्ये एक प्रकारची उत्क्रांती होत आहे. 'चपराक'ने प्रकशित केलेल्या माझ्या मागच्या काही लेखांमध्ये मी रोबोटिक्स अटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.) बद्दल बरीचशी सकारात्मक बाजू मांडली होती. आज रोबोटिक्स आणि ए. आई. विषयीच्या जरा नकारत्मक बाबींबद्दल बोलूयात. रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. यात शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. मग असं सगळ होत असताना मानवाने आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या कितपत आहारी जाणं योग्य ठरेल याचाही कुठंतरी विचार व्हायला हवा. 

           कोणत्याही देशाचं नवनिर्माण तंत्रज्ञान माहिती करून घ्यायच असेल तर त्या देशाच्या संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या शस्त्र-अस्त्रांकडं नजर टाकली पाहिजे, त्या देशाच्या संरक्षण दलाचा पाठपुरावा घेतला पाहिजे. यातील बऱ्याचशा गोष्टी संवेदनशील आणि गुपित असल्या तरी ज्या काही समोर येतात, त्या निश्चितच आश्चर्यकारक असतात. अगदी विचार करायला लावणाऱ्या असतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या शत्रूराष्ट्राचा अधिकृतरित्या किंवा छुप्या पद्धतीने याबाबतचा पाठपुरावा घेतं असत. म्हणूनच इथं संरक्षक दलातील आर्टिफिशियल इंटीलिजन्ससंबधित काही बाबी समजावून घेणं योग्य ठरेल. आर्टिफिशियल इंटीलिजन्स(ए. आई.)च्या वाढत्या वापरामुळे आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडून येत आहेत. ते आपल्या देशापर्यंत पोहचलेसुद्धा आहेत किंबहुना मोबाईल आणि कॉम्पुटरद्वारे ते आपल्यापर्यंत देखील पोहचले आहेत. संरक्षण दलातदेखील ए. आई.चा वापर होत असताना आपल्याला दिसेल. आताच्याच एका उदाहरणावर आपण प्रकाश टाकू. अर्थात मागच्या काही दिवसात काही परीक्षणासाठी भारतीय संरक्षण दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले होते. याच्याविषयी अजून बरेच संशोधन करण्यासाठी एका उच्च स्तरीय गटाची किंवा समितीची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि आपली संरक्षण ताकत वाढवण्यासाठीही याची गरज होती हेदेखील यावरून स्पष्ट होते. यासाठी लागणारे तज्ञ सायबर ते अंतरीक्ष क्षेत्रातील निवडले जातील. भारतातील टाटा ग्रुपच्या एका कंपनीकडे याचे नेतृत्व असणार आहे.

               कोग्निटीव्ह रोबोटिक्स, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.), मशीन लर्निंग यासांरख्या संकलपनेमुळे कॉम्पुटर सोफ्टवेअर्स आणि इतर यांत्रिकी उपकरणे सक्षम बनत आहेत. खरे तर, अशा यंत्रणा मानवाच्या बुद्धीपेक्षा अधिक जलद विचार करून त्या पटपट निर्णय घेवून आणखी स्वयंभू बनत असतात. झटपट पुरवले गेलेल्या कॉम्पुटराईज्ड सिग्नल्समुळेच बरेचशी वळणं घेणाऱ्या विमानामागे क्षेपनास्त्र हजारो किलोमीटर अंतरावरदेखील अगदी अचूक निशाणा घेतं. आता इथं आपल्या डोक्यात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील. या प्रणालीमध्ये काही पुरवलेली माहिती कमी असेल किंवा किंचीतशी जरी चुकीची असेल तर ? त्या संवेदनशील परीस्थितीत त्या यंत्रामध्ये करत असलेल्या काही गोष्टी परत घेण्याची क्षमता नसली तर? या यंत्रांच टेस्टिंगच जर चुकीच्या पद्धतीने झाले असेल तर? हो अगदी खरं आहे, असे प्रश्न डोक्यात नाचू लागणं अपेक्षित आहे. आपल्या शिक्षणपद्धतीप्रमाणेच सोफ्टवेअर्स आणि रोबोटमधेही बौद्धिक पातळीवर वर्गीकरण केले जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये देखील विविध पातळ्या असतात. त्यापैकी नॅरो आणि जनरल या दोन आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, स्पॅम ई-मेल फिल्टर्स, अटो सर्च, स्वयंचलीत वाहनं किंवा स्वतः गेम खेळणारा कॉम्पुटर ही नॅरो संकल्पनेशी निगीडीत उदाहरणे आहेत. वरती सांगितलेली संरक्षण क्षेत्रातील उदाहरणे जनरल आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये मोडतात. हे सर्व रोबोट अगदी मनुष्याप्रमाणे भावना प्रगट करतील अशा लेव्हलपर्यंत बनवलेले असतात. जसे की ते रोबोट स्वतः आपली ज्ञान ग्रहण करत असतात. अनुभवामधून शिकत असतात. मग यात जर एखादी त्रुटी असेल तर मनुष्याने स्वतःच आपल्यासाठी संकट निर्माण केल्याचे चित्र तयार होईल आणि त्याला पळता भुई कमी पडेल. याचीच भीती अनेक संशोधकांना आहे. असं घडण्याच्या शक्यता प्रत्येक्षात यायला अजून २०-२५ जाऊ द्यावे लागतील. आता सध्यातरी तसे घाबरण्याचे कारण नाही. परंतु आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत असे आपण समजू शकतो. तोपर्यंत काही वर्षात यावर संशोधन होवून बरेच तोडगे निघतील असा विश्वास ठेवायला हरकत नाही. नॅरो आणि जनरल या दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण दलात अगदी खुबीनं केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. जसे की ड्रोन्स म्हणजेच चित्रफिती दाखवणारी छोटी विमानं. त्यांची संख्याच जास्त ठेवायची कि त्यांना नष्ट करेपर्यंत संरक्षण दलाच अपेक्षित असलेलं काम पूर्ण झालं असलं पाहिजे. यालाच स्वार्मिंग असे म्हणतात. लष्करात स्वार्मिंग पद्धत अतिशय प्रचलित आणि प्रभावी होत आहे कारण रोबोटची संख्या, लक्ष्य गाठण्यातील नेमेकेपणा, कसल्याही धोक्याच्या परीस्थितीत पुढे जाण्याची क्षमता यामुळे शत्रूवर विजय मिळवता येवू शकतो. अशी ड्रोनसारखी छोटी रोबोट्स बनवण्यासाठी तसा जास्त खर्च येत नाही. ही संरक्षण दलासाठी महत्वाची बाब आहे.

             संरक्षण दलातील आधुनिक शस्त्रास्त्र म्हंटल की अमेरिका, रशिया, कोरिया अशा अनेक देशांची नावे समोर येतात. इथं मात्र आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या बाबतीत चीनसारखा देश आघाडीवर असल्याची चिन्ह आहेत. ढेस्ला आणि स्पेसेक्स या नावाच्या संस्थाचा मुख्य अधिकारी एलोन मस्क याच्या मते, जर तिसरं महायुध्द घडलं तर रोबोटिक्स त्यामध्ये अग्रभागात असेल. होणाऱ्या हल्ल्यांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असेल. कदाचित या कारणामुळे अंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत मनुष्याच्या डीएनए पासून नवीन मनुष्य तयार करण्यावर अर्थात क्लोनिंग करण्यावर जशी बंदी आणली गेली तशीच बंदी आर्टिफिशियल इंटीलिजन्सवर देखील आणावी लागेल. परंतु रोबोटिक्समधील संशोधकांच्या मते, बंदी आणण्यासारखे सर्व प्रकार अति होत असून याचा विरोधही केला गेला आहे आणि हे विधान हास्यास्पददेखील ठरवले गेले आहे. आण्विक शास्त्रांवर काही कायद्यांतर्गत जशी नियमावली आखली, काही करार केले गेले तशेच आंतरराष्ट्रीय कायदे रोबोटिक्ससाठी बनवावे लागणार आहेत, यात शंका नाही. या युगात ए. आई. हे तंत्र एक प्रकारची दुधारी तलवार आहे. ए. आई.ची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू देखील आहे.

      मागच्या काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलेळे जेष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की संपूर्ण कृत्रिम बुद्धीचा विकास मानवीवंश संपवेल आणि एकदा मनुष्य कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करतो तसा तो रोबोट स्वतःच वेगाने पुढे जाईल आणि सतत वाढत जाणाऱ्या दराने स्वत: ला पुन्हा डिझाइन करेल. हळूहळू जैविक उत्क्रांतीमुळे मर्यादित असलेला मानव प्रतिस्पर्धा करू शकेल का? आणि त्यांचे स्थान पुढे ढकलण्यात येईल का? ए. आई.बद्दल अशी गंभीर प्रमेयं त्यांनी मांडून ठेवली गेली आहेत. नवनवीन संशोधनाचा वापर मनुष्याच्या उद्धारासाठी करायचा कि संहारासाठी? शेवटी याचा निर्णय माणसानेच घ्यायचा आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक देशांना आहेच. २००१ साली ओसामा-बिन-लादेनने अमेरिकेवर केलेला हल्ला, केवळ विमानं वापरून केला होता, मग हे जर शस्त्र काही दहशतवादी संघटनांच्या हाती लागलं तर तुम्हीच विचार करा काय होईल ?

Published in Saptahik Chaprak, Pune and Dainik Surajya Solapur.

Monday, August 13, 2018

केवळ स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कसं चालेल ?

               देश स्वातंत्र्य होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहमीप्रामणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, राष्ट्रगान झाले, सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या राष्ट्रध्वजाचे स्टीकर आपल्या खिश्याला लावले. आणि भाषणे देवून तीन रंगाचे फुगेही आकाशात सोडले. होय, आनंद आहे! भारताचा प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण 'चिरायु होवो' म्हणत आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या स्वातंत्र्यचा, लोकशाहीचा घात तर करत नाही ना हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले, राज्यघटना आली त्यानुसार ७१ वर्षे प्रशासनही चालले. तरीही आपल्यासमोर स्वातंत्र्याच्या निगडीत बरीच संकटं आहेत, म्हणजेच आपण राज्यघटना स्वत:हून अर्पण करतो याचाच अर्थ असा असतो की आम्ही एक नागरिक म्हणून घटनात्मक मुल्यांना जोपासण्याचे जबाबदारी घेत आहोत. जी जबाबदारी खूप मोठी असते, जी आम्ही देवावर किंवा कोणा अचिंत्य शक्तीवर सोपवत नाही आहोत. त्यात जे नमूद असेल त्या घटकांनाच धरून आम्ही आपण आपले स्वातंत्र्य आत्मसात करत असतो आणि जगत असतो. आज आपण पाहत आहोत  स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा होत असतो. स्वातंत्र्य होवून जी वर्षे सरली आहेत त्याचा आपण स्वतःहून मागोवा घेतो का? आपली घटना आपल्याला समता, बंधुता देते किंबहुना या समतेच्या तत्वाचे सरकारलाही भान असते काय? याचेही उत्तर नकारार्थी येते. भलेही आज आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असलो तरी या स्थितीतल्या शिखविरोधी हिंसक दंगली असोत अथवा गुजरातमधील मुस्लिमांचा संहार असो, कारण काहीही असले तरीही, ते शासकीय प्रेरणांनी केल्या जावेत, हे कोणत्या स्वातंत्र्याचे किंवा प्रजासत्ताकचे लक्षण आहे? दलित गोहत्या करतात म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली, मूलं पळवण्याच्या टोळी समजून लोकांचा जीव घेण्यात आला? कोरेगांव-भीमा मध्ये झालेली दगडफेक? हेच आपल्या घटनेनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का? आंबेडकर म्हणाले होते, जातीभेद नष्ट झाल्याशिवाय देशाचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य नाही, परंतु आजचे चित्र स्वातंत्र्यपूर्व जसे होते त्यापेक्षाही विचित्र दिसत आहे. जातिभेद नष्ट होण्याऐवजी आणखी घट्ट होताना दिसत आहे. आपण या महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या जेवढ्या नाचत-वाजत साजऱ्या करतो त्याऐवजी त्यांचे विचार अमलात आणले तर तेच खऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्याच साजरीकरण ठरेल. आपल्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतो परंतु आपण त्यांना कितपत डोक्यात घेतो ? ७१ वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला  आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या  हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्तेच्याच वाटेवर चालत आहोत  कि विनाशाच्या असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.  
             "यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है!" १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबईतील मोर्चात आण्णाभाऊ साठे गर्जले होते, हे आपल्याला आजही तितकेच सत्य विधान दिसेल. कारण एकविसावे शतक आणि भारत जे सामतोलात्मक चित्र दिसायला पाहिजे होते, आज ते चित्र दिसत नाही. ७१ वर्षानंतरही आमच्या देशासमोर स्त्री-भ्रुण हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, स्त्री अत्याचार, जातीवाद, दहशतवाद, प्रांतवाद, भाषावाद असे भले भले प्रश्न तोंड आ असून उभे आहेत. आज हा भारतीय भारतीयत्वाचीच व्याख्या विसरला आहे,  यासाठी आज शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर पुन्हा येणार नाहीत, आमच्या खांद्यावरचा भार हलका करायला याचेही भान आम्हा असले पाहिजे.
                आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय?  काश्मीरचा प्रश्न कसा सुटणार? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. यातूनच कट्टरता वाढत जात आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रातील संशोधनात किती भारतीय आहेत? यावरही विचार करून हे प्रमाण आपण ७१ वर्षात वाढवलं काय? असे अनेक प्रश्न आजही आहेत. देशाचा जितका पैसा भ्रष्टाचाराखाली गुंतला आहे, तितकाच पैसा दैववादाखालीही गुंतला आहे. धार्मिक द्वेष  आणि इतर भरकटलेल्या मार्गावरच आपले तरुण मनुष्यबळ आपण आज वाया घालवत आहोत. आम्ही गुलामगिरीतून बाहेर  पडलेल्या, भारतासारख्या बलाढ्य आणि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करत आहोत. खालच्या पातळीपासून ते अगदी अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली दखल घेण्याइतपत आपण स्वतः देशासाठी सकारात्मक धडपडत राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण कायमच झपाटून गेलेलं असलं पाहिजे. जसे कि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे, तसेच आपणही वेडे होवूयात या स्वातंत्र्यला सार्थी करण्यासाठी. यातूनच खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत-घेत असता प्रत्येक नागरिकाने स्वत:प्रत अर्पण केलेल्या संविधानाबाबत जागरुक रहायला हवे. आपल्या आचरणात तसेच राष्ट्रीयत्व आणायल हवे! अन्यथा आभासी स्वातंत्र्याचा आरोप आम्हीच सिद्ध करु आणि मग आमच्या राष्ट्रप्रेमालाही केवळ भावनिक सोडला तर वास्तवातही काहीच अर्थ राहणार नाही. स्वतःच्या समाधानास्तव आजून किती दिवस तीच खोटी गाणी रेटून गाणार? कारण सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा!' म्हणण्याऐवजी 'सारे जहाँ से सच्चा हिन्दोस्ताँ हमारा!' असे म्हणणे मला योग्य वाटते!

Thursday, August 9, 2018

संजय सोनवणी - माणूस जरा वेडा आहे गड्या !

या जातीचा इतिहास, त्या जातीचा इतिहास
गरज नसताना वाटते
जगावेगळीच कोडी हा उलगडतो,
एक प्रश्न सोडवतो अन मग
आम्हा दुसरा प्रश्न  पाडतो,
लेखक कसला,
कसला हा चित्रपटनिर्माता अन संगीतकार ,
समजतो स्वतः कवी कधी अन कधी हा इतिहासकार...
परी जबरी आम्हा शोभतो हा कादंबरीकार...
विसंगत भासणाऱ्या प्रसंगांना
नेहमीच हा शब्दांनी छेडतो,
जगाला उपदेशाचे डोस पाजत 
स्वतः मात्र सोडलेली पुन्हा चालू करतो,
हो रे
माझंच मन सांगते मजला
विचारांची देवाण-घेवा करण्या,
सोबत जरा एखाद्या शहाण्याशी
कर कि रे वेड्या,
हा माणूस जरा वेडा आहे गड्या !

विचारा याला कसे घडले पानिपत
अन कसा होता पेशवाईचा इतिहास,
दहशतवादाला रूपं किती?
नी धनगरांचा गौरवशाली इतिहास,
उकरून काढले सत्य वाघ्याचे
करूनी याने शब्दांचा प्रहार,
सांगून टाकेल मग हेही 
कोण होते रे महार?
सातवाहन–शातवाहन–शालिवाहन
यातला फरक नेमका काय?
हिंदू अन वैदिक संमिश्रीत
धर्मातलाही फरक नेमका काय?
भलतंच भाषेच मुळ याचं अन
भलत्याच याच्या बाराखड्या
हो रे
हा माणूसच जरा वेडा आहे गड्या !

माहित होते आम्हा केवळ आजतोवर चार वेद
मग कुठ्न कसा आणला याने असुरांचा आणखीन वेद
घरात याच्या ढीग पुस्तकांचा, महाभारतालाही शून्य करतो,
म्हणून हा कायमच लिहित नी लिहित राहतो..
दुनिया हादरवणारी कटू प्रमेयं अन मिथकं मांडतो,
चित्रकारही बनून कधी, हा दुनियेला आपलेच रंग देतो,
बोलतो हा कधी शेतीवर, शिक्षणावर, कधी अर्थावर..
विद्रोहासारखा मग प्रहार करतो
वेदांवर, जातीभेदांवर नी अजून इतरही अनर्थान्वर..
साहित्यातले योगदान याचे
स्मरेल समाज पिढ्यानपिढ्या,
कारण
हा माणूस तर भलताच वेडा आहे गड्या!

- गणेश.

Wednesday, August 8, 2018

धोके तंत्रज्ञानाच्या वाटेवर

विज्ञानाने मानवी जीवनात खूप बदल घडवून आणले आहेत. 'विज्ञान शाप कि वरदान'  हे वाक्य आपण यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. खरेतर, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण स्वतःला योग्य दिशेने घेऊन जात आहोत काय? याच वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आपण जे मोबाईल, कॉम्पुटर किंवा इतर जी प्रोग्रामिंगद्वारे चालणारी उपकरणे वापरात आहोत त्यातून जे आत्मसात करत आहोत याचा वेळोवेळी विचार करण्याची गरज आहे. या उपकरणांचा आपल्याला आजच्या डिजिटल युगात जगत असल्याचा भलताच  कैफ चढला आहे. जवळ असणाऱ्या कुटुंबीय, नातेवाइकांपेक्षाही मोबाईल आपल्या आवडीचा  होऊन बसला आहे. उदाहरणार्थ. मानसतज्ज्ञांच्या मते, केवळ टाईमपास म्हणून व्यक्‍ती या गेम खेळायला सुरुवात करते. परंतु, याचे सवयीत रूपांतर कधी झाले आणि गेम हा जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला, हे खेळणार्‍याला कळतसुद्धा नाही. गेम खेळण्याचे व्यसन काहीसे वेगळ्या स्वरूपाचे असते. हे गेम कधी व्हिडीओ गेम स्वरूपात असतात, तर कधी डिजिटल गेमच्या स्वरूपात.

आजचा तरुणवर्ग  सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेला दिसत आहे. लोकांना  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक  साईट्सचे वेड लागलेले आहे. खरे म्हणजे, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणीही उठतो आणि काहीही लिहितो. यात अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. तर काही समाजकंठकांच्या भावना भडकल्याही जातात. पण काहीही शेअर करत असताना आपल्या सत्सक विवेकबुद्धीला असे करणे पटते का? आपण भारतीय म्हणून योग्य करत आहोत का ?  या शंभरवेळा विचार करूनच असे पाऊल उचलावे, शब्द हे धार असलेल्या शास्त्रापेक्षा भयानक हत्यार आहे. बरेच लोक चॅटिंगच्याही नको तेवढे आहारी गेलेले दिसतात. यामध्येच फेक प्रोफाईलचा सुळसुळाट समोर आला आहे. आपली खरी ओळख लपवून कोणी तरी दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल बनवायचे आणि समाज भडकवणारे काही तरी शेअर करायचे किंवा ज्याचे फेक प्रोफाइल बनवले आहे, त्याची अश्लील फोटो शेअर करून बदनामी करायची. असे महाभयानक अनेक गुन्हे आज पोलीस स्टेशनमधल्या फाईल्समध्ये बंद आहेत.

हे झाले सोशल नेट्वर्किंग साईट्स वापराबद्दलचे, परंतु आपल्या इतर दैनंदिन व्यवहारासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असतो. जसे की इंटरनेट बँकिंग, ओनलीन शॉपिंग, बिल भरणे इ. हे करत असताना आपण पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करणे, यूजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक ई-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्‍तिक कॉम्प्युटरसाठी, मोबाईलसाठी अँटिव्हायरस वापरणे याकडेही प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे. एक्सकोड घोस्ट, यूमी, मोबिसेज, वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेअर अ‍ॅडव्हायजरी, कोअर बूट, डोर्कबूट, मेलिसा, झीअस, मायडूम अशा महाभयानक व्हायरसेसमुळे आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो, आपला कॉम्पुटर, मोबाईल हॅक शकतो कालांतराने आपले बँक खाते हॅक होऊ शकते. हॅकिंगसाठी फेक ई-मेलचा वापर भयंकर वाढला आहे. ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून यूजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अ‍ॅक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात.

इंटरनेट गेमच्या माध्यमातून ‘गेमिंग डिसऑर्डर’ नावाचा महाभयानक मानसिक आजार जडत असतो, हे गेम खेळणाऱ्यापैकी  बर्‍याच जणांना माहीत नाहीय; पण अलीकडच्या काही दिवसातच या आजाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारांच्या यादीत केला आहे. गेमिंगमुळे आपल्या दिनचर्येत होणार्‍या बदलांकडे आपणच डोळसपणे पाहिले नाही, तर धोका अटळ आहे.  ‘डब्ल्यूएचओ’ आणि अन्य काही तज्ज्ञांच्या मते, सध्या गेमिंगच्या आजाराने ग्रस्त झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, सुमारे 3 टक्के गेमर्सना या व्याधीने ग्रासले आहे. परंतु, भविष्यात ही संख्या प्रचंड वाढणार आहे. जगभरातील लाखो गेमर्सना ‘गेमिंग डिसऑर्डर’ने ग्रस्त रुग्ण असे संबोधणे चुकीचे ठरेल. अगदी त्यांना गेमिंगचे अत्याधिक व्यसन असले तरी! काही व्यक्‍ती अगदी इच्छेविरुद्धही गेम खेळत राहतात. अशा व्यक्‍तींना ही अवस्था प्राप्‍त झाली आहे, असे मानायला हवे. या लक्षणावरूनच कुशल डॉक्टर या आजाराची ओळख पटवू शकतील. गेम खेळण्याचे व्यसन केवळ लहान मुलांमध्येच असते, असे नाही. मोठ-मोठ्या कार्यालयांमध्येही कर्मचारी अँग्री बर्ड, टेम्पल रन, कँडी क्रश, कॉन्ट्रा यासारखे मोबाईल गेम खेळत बसलेले दिसतात. डिजिटल दुनियेत राहत असल्याबद्दल आज आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो आहोत. परंतु, या दुनियेत असणारी विविध गेमिंग अ‍ॅप्स व्यसन जडावे अशी महाभयंकर आहेत. या व्यसनाचा परिणाम म्हणून आवेग नियंत्रणाची यंत्रणा म्हणजे ‘इम्पल्स कन्ट्रोल मेकॅनिझम’वर परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्‍ती गेम खेळत असते, तेव्हा मेंदूचा काही हिस्सा उद्दीपित होतो. ज्याप्रमाणे अमली पदार्थांच्या सेवनामुळे ही उद्दीपनाची प्रक्रिया घडते, तशीच हीसुद्धा प्रक्रिया असते. त्यामुळे कॉम्पुटरच्या, मोबाईल गेमच्या जास्त आहारी जानेही धोकादायक ठरू शकते.

अर्थात इंटरनेट हे वापरताना आपला हवारेपणा, आपली मानसिकता नडत असते हे इथं आवर्जून सांगावेसे वाटते. एखाद्या लोटरीच्या मेलच्या बळी पडणे, गेम खेळून जास्त स्कोर करण्याची आपली मानसिकता, स्वस्त दारात खरेदी करण्याची मानसिकता, इ. याबरोबरच सेफ पासवर्ड कसा तयार करावा, व्हायरसचे हल्ले, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक म्हणजे काय, सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सॉफ्टवेअर पायरसी, आयडेंटिटी थेफ्ट, ऑनलाईन छळ, एथिकल हॅकिंग, मोबाईलची सुरक्षितता या सर्व बाबींबद्दल आपण जागरूक राहिले पाहिजे.

Pubished in Saptaik Chaprak , Pune. 6 to 12 Aug 2018 .
Pubished in Dainik Surajya, Solapur. 11 Aug 2018 .
Pubished in Masik Adhunik Sarthi, Solapur. Jan 2019