Tuesday, June 12, 2018

मनाचा ठाव घेणारी कादंबरी

काळीजकाटा           
                      मी माझ्या लेखांबद्दल चर्चा करण्यासाठी चपराकच्या ऑफिसला गेलो होतो. काही वेळ चर्चा झाल्यानंतर संपादकांनी मुद्दामहून माझ्या हातात काळीजकाटा टेकवली. मी थोडासा विरोधच केला. वाचायला वेळ कुणाकडं असतो? काही पुस्तकांसह मी घरी आलो. आणि मागच्या आठवड्यात काळीजकाटाची सहजच पाने चाळीत होतो आणि पाने चाळताचाळता  स्वतः ला हरवून बसलो. एकदाची ही कांदंबरी हातात आली, पुन्हा खाली ठेवलीच नाही. जरा वेळ वाटले मी वाचतोय कि एखादा सिनेमा पाहतोय, अशी जादू लेखकाच्या शब्दात आहे. अर्थात मी कोणी समीक्षक म्हणून नाही तर एक वाचक म्हणून मी येथे बोलत आहे. 

        कथेत प्रसंग साधून कवितेच्या ओळी, गावाकडील वातावरण, वयात येणाऱ्या प्रेमयुगलाचे निखळ प्रेम आणि कथेत मोजकी पात्रे ठेवल्याने वाचताना वाचकाचा गोंधळ उडत नाही. लेखकाने दुष्काळाची दाहकता उभेहूब मांडली आहे. प्रेम हा एक जिवंत मानवाचा गुणधर्म आहे. प्रेम माणसाच्या जीवनात आनंदही घेवून येतो आणि दुःखही. नायक-नायिकेचे व्यापक, उदात्त आणि तरीही शोकात्म प्रेमकथेबरोबरच या कादंबरीत अजून एका लेखकाची उपकथा आहे. त्यातच त्यांचा विद्रोह ठोसपणे मांडला आहे. तोही वाचकांच्या मनाला भिडतो, वाचकांना गुंतवून ठेवतो. पुढे काय घडेल याची ओढ लागते. प्रेमाने झालेली अवहेलना कोणाला सांगता येत नसते, आपण ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो त्या एकमेकांनाच आपल्या भावना कळू शकतात. जेव्हा आपल्याला आपले प्रेम मिळत नाही, तरही आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या   प्रेमयुगलाच्या मनाची अवहेलना काळीजकाटात मांडली आहे आणि हे वाचताना डोळे पानावले नाही तरच नवल! असे आत्मिक प्रेम लेखक उभारण्यात यशस्वी झाला आहे.

        पंढरपुरचे जेष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी काळीजकाटाचा गौरव केला आहे कारण शब्दात तशी किमयाही आहे.  "काळजातला शब्द कागदावर आला कि काळीज हलकं वाटू लागतं आणि कागद जड होतो. कागदावरचा शब्द माणसात गेला कि कागद हलका होतो आणि माणूस जड! शब्दाच्या विचारानं जड झालेली माणसं समाजात धड वागू लागतात" अर्थातच अशा शब्दांनीच कादंबरी जड केलेली आहे. अर्थात तुम्ही वाचाल तर तुम्हीही विचाराने जड व्हाल. म्हणूनच नक्की वाचा. काळीजकाटा!

Published in Dainik Surajya, Solapur.