Thursday, November 8, 2012

Why we celebrates Diwali?

             बळीराजास मारणारा वामन विष्णूचा अवतार कसा? असा प्रश्न प्रथम  महात्मा फुले यांना पडला होता.वैदिक धर्मात लिहिलेली कुठलीही पुराणकथा बळीराजा दुष्ट होता, तो कपटी होता, त्याच्या काळात प्रजा दुखी होती असे सांगत नाही. मग देवाला त्यास मारण्यास अवतार का घ्यावा लागला? कोणते संकट मानव जातीवर आले होते? म. फुलेंनी वामन, परुशुराम, नृसिंह, मत्स्य, कच्छ, वराह या अवतारांची तर्कसंगत चिकित्सा केली आहे. आम्हा सर्वांचा धर्म एक असता तर... बहुजन बळीराजाची पूजा करतात परंतु आर्य लोक मात्र बळीराजाला मारून वामनाची पूजा करतात, अशी विसंगती का? असा प्रश्न फुलेंना पडला आहे, अर्थात या लेखातून जातीयता वाढवण्याचा कोणताही उद्धेश नसून सत्य आणि दिवाळीबद्दल लिहिणे आहे.

        बळीराजाने सर्व भारतीय उपखंड जिंकला होता. सर्व वैदिक देवांचा पराभव केला होता. बळीराजाच्या सैनिकदलात जोतीबा नावाचा शूर अधिकारी होता. त्याचे  राहण्याचे ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी जवळच्या एका पर्वतावर होते.  बळीराजाचा दक्षिणेकडील प्रांत खूप मोठा होता, त्याचे नऊ खंड पडतात. यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले, त्यांच्या योग्यतेप्रमाणे हर एका खंडोबाच्या हाताखाली बहुत मल्ल असत, त्यास मलुखान म्हणत. त्यापैकी जेजुरीचा खंडोबा एक होता. तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतीच्या ताब्यातील मल्लांच्या खोडी मोडून त्यास ताळ्यावर आणत असे,  यास्तव त्यांचे नाव मल्लअरी असे पडले. तो धर्म न्यायाने लढण्यात अहंकार बाळगीत नसे, परिणामी त्याला मारतोंड असे नाव पडले. आज त्याचा अपभ्रंश मार्तंड होय. उत्तरेस काशि शेजार बळीराजाचा दहावा खंड होता. बळीराजाचे उत्तरेतील साम्राज्य काळभैरव नावाचा अधिकारी सांभाळत असत . तो गायनातही मोठा शौकीन होता.  गायनात भैरवी नावाचा रागही आहे. हा अधिकारी काशी क्षेत्राचा कोतवाल होता.बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि नऊ खंडाचा न्यायी असे दोन अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामांत ठेवले होते. आज महासुभाचा अपभ्रंश म्हसोबा झाला. महाराष्ट्रातील लोक्कांना ,मराठा म्हणले जात असे.  आजही यांच्यातील लोकांमध्ये एकही कुळ असे सापडणार नाही, कि या सर्व महापुरुषांना नैवद्य दाखवल्या शिवाय अन्नाचा कण ग्रहण केला जाईल, शेतात विळा घातला जाईल. 


         खंडोबाची, जोतिबाची, बहिरोबाची बहुजन लोकांना सुखी ठेवण्याची शर्थ लागत असे. आज संस्कारात तळ उचलणे हि म्हण आहे , पूर्वी या महापुरुषांची नावे घेवून तळी उचलली जात असे. जसे कि 'हर हर महादेव' याप्रमाणे जोतिबाच्या नावनं चांगभलं, सदानंदाचा उदय उदय.. येळकोट येळकोट जय मल्हार हे आजही चालू आहे.  सर्व  बहुजन समाज सुखात होता. बळीराजाचा  राज्यकारभार सुरळीत चालू होता. वामन आपल्या फौजेसहित बळीराजाच्या राजधानीत एकदम शिरून रयतेस पिडा देत राजधानीत घुसला. बळीराजाने देशातील सर्व फौज एकत्र करायची सोडून मोजक्या खाजगी फौजेसहित लढण्यास सुरुवात केली. बळी भाद्र्पत वद्य प्रतिपदेपासून बळीराजा वामानाशी लढण्यात इतका गुंतला कि त्याचे त्याला देहभान समजेना. बळीराजाची विंध्यावली राणी विनाअन्नपाणी आठ दिवस बळीराजाच्या प्रतीक्षेत राहिली. ती महावीराची प्रार्थना करत बसली होती. बळीराजा मृत पावल्याची बातमी कळताच तिने देहत्याग केला आणि तेव्हापासून बहुजानामध्ये सती जाण्याची वहिवाट पडली. तिकडे बाणासुर वामानाशी मोठ्या निखारीने लढला  अश्विन शुद्ध नवमीच्या रात्री वामन उरलेले सैन्य घेवून  पळाला. मस्करीने वामनाच्या पत्नीने बळीराजाचा कणकीचा पुतळा केला होता. आणि तिने वामनास सांगितले, बळी तुमच्याशी लढण्यास अजून आला आहे, तेव्हा त्याने कानिकीच्या बळीस लाथ मारली. बळीराजाच्या क्षेत्रातून पलायन करताना वामनाने खूप सोने लुटले होते.   त्याचा अपभ्रंश 'शिलांगनाचे सोने लुटणे' होय. पुढे बाणासुराने दुसऱ्या बळीच्या हाती सत्ता दिली, घरोघरी गेले, स्त्रियांकडून ओवाळून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या म्हणाल्या 'इडा पिडा टळो, बळीच राज्य येवो' तथापि बळीच्या राज्यातील क्षेत्रीय घरातील स्त्रियानी दर वर्षी अश्विन शुद्ध दशमीस संध्याकाळी आपल्या भावास, पुत्रास ओवाळून  बळीच राज्य येवो हि इच्छा जिवंत ठेवली, आणि पुढे बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाची पूजा केली जाऊ लागली व त्यामुळे आज उत्साहात दिवाळी साजरी केली जाते...

संदर्भ - बळीवंश 
(डॉ. आ. ह. साळुंखे )
गुलामगिरी (संपादित )
(म. जोतीबा फुले )