Wednesday, November 7, 2012

अंधश्रद्धा


                     'जय सत्य साईबाबा' हा मेसेज २१ जणांना पाठवा, तुम्हाला साईबाबाचा साक्षात्कार होईल आणि एक खुशखबर तुम्हाला ऐकायला मिळेल,  नाही तर तुम्हाला संकटाने ग्रासले जाईल, असे अनेक मेसेज मला येत होते आणि येतही आहेत. मी शाळेत असताना दोन वेळा अशी निनावी पत्रेही आली होती, ११ पत्रे नाही पाठविल्यास ११ दिवसात कुटुंबातील कोणीतरी मृत्यु होणार होते. मला शनीची साडेसाती लागणार होती .  परंतु मी याकडे दुर्लक्ष केले, तुम्हालाही असे मेसेज, पत्रे आली तर आश्चर्य वाटून घेवू नका. सोशल नेट्वर्किंग साईट्स, मिडिया याद्वारे अशी अंधश्रद्धा पसरवविण्याचे काम काही तथाकथित धार्मिक शक्तींकडून नियोजनपूर्वक  होत आहे. पोलिसांनी वेळोवेळी ताकीद देवूनदेखील मानसिक भान हरपणारे लोक अशा अंधाश्रेद्धेला बळी पडतात. धार्मिक षडयंत्रात गुंतत जातात.
 
                   पूर्वी आपत्य होत नसेल, तर वैद्य सोडून स्वामी बाबाकडे स्त्रीला धार्मिक उपचारासाठी पाठवले जात असे, तो बाबा त्या स्त्रीशी.... परिणामी जोडप्याला आपत्यही मिळे आणि बाबाची वासनाही पूर्ण होई. स्त्री लाजेखातर आणि बाबाच्या भावनिक दबावाखातर कुणाशी काही बोलत नसे. मेंदू गहाण ठेवणारा अशिक्षित समाज मात्र याला चमत्कार समजत असे. आजसुद्धा चित्र काही वेगळे नाही. हिरा, माणिक, पाचू, मोती, शनी सुरक्षा कवच घेवून संकट दूर होणार असतील, तर भारतदेश मागेच महासत्ता झाला असता, असा सोपा प्रश्न आम्हाला कधी पडला नाही. धार्मिक शक्तींचे हे षडयंत्र समजून घ्यायला कोणीच तयार नाही. धार्मिक समजुतींना बळकट करणे, त्यातून अंधश्रद्धाचे जाळे विणणे आणि धर्माची बाजारपेठ चालू ठेवणे असा हेतू यामागे असतो. अडाणीच नव्हे, तर सुशिक्षित लोक यात पद्धतशीर अडकले जातात. आज अनेक टी. व्ही. वाहिन्यावर आपल्याला अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिराती दिसतात.

          जसजसे विज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात प्रगती झाली, तशी अफवा आणि अंधश्रधेच्या बाजाराला आणखी तेजी आली. खाजगी टी. व्ही. वाहिन्यांवर शनीच्या सुरक्षा महाकवचाचे चांगलेच वादळ वाहत आहे, त्याच्या किमती गगनाला भिडणाऱ्या आहेत, या जाहिराती अजून बंद नाहीत, याचा अर्थ कवच भलतेच खपले जात आहे. अर्थात शनीच्या नावे आजवर भोंदू लोकांचे दुकान खूप चालले आहे. शनी शिंगणापूर गावची राखण खुद्द शनी देव करत आहे, तिथे एकाही घराला दरवाजा नाही, परंतु दक्षणा पेटीला मात्र भलेमोठे कुलूप आहे, हे वास्तव नाही का?

           क्युरीओसीटी मंगळावर पोहचले, इथे मात्र मंगळ काही लोकांच्या जन्म कुंडलीतून निघायचे नाव घेत नाही. त्यासाठी इथ यज्ञाची आणि विधीची गरज पडते. विघ्नहर्त्या म्हणवणाऱ्या गणपतीचा इथे लिलाव होतो, गणपती चक्क दुध पितो. धर्मं आणि भक्तीचा व्यापार फळफळत रहावा म्हणून भक्तीचे काही ठेकेदार असल्या अफवा पसरवत आहेत.  पैशासाठी मेंदू गहाण ठेवणारी मिडिया याचा प्रसार करते आहे. ते मूर्ख आहेत आणि आम्ही महामूर्ख आहोत अशी स्तिथी इथल्या लोकजणांची दिसते. संस्कृतीचे उदात्तीकरण केले जाते, आणि  विकृती मात्र हाणून पडावी लागते,  हे समजूनही आजसुद्धा आम्ही नासमज का आहोत? तुम्ही ज्याला श्रद्धा समजता त्या वैश्विक दृष्टीने अंधश्रद्धा तर नाहीत ना?