Friday, November 23, 2012

तुकाराम आणि शेक्सपिअर

        सर्व मोठी माणसे एक सारखाच विचार करीत असावेत. भाषा, काळ वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का? असा विचार शेक्सपिअर आणि तुकाराम यांचे साहित्य वाचून करायचा ठरवले, तर खूप सारखेपणा आढळतो. हा अभ्यास केला आहे, तुकोबाप्रेमी अरुण भालेराव यांनी!

        शेक्सपिअरचे आपल्या सर्वांच्या परिचयाचे एक वाक्य घेऊया, "नावात काय आहे?" मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलीयेट मध्ये ज्युलीयेच्या तोंडी असे होते "नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसऱ्या कुठल्याही नावाने तेवढेच गोड आणि सुवासिक वाटते. हेच तुकोबा म्हणतात "तुका म्हणे राजहंस ढोरा नावे। काय तया घ्यावे अलंकाराचे।।" म्हणजे एखाद्या बैलाचे नाव राजहंस ठेवले तर या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग? या  अर्थाचा अजून एक अभंग,

"सावित्रीची विटंबना, रांडपणा करीत असे।।
काय जाळावे ते नाव, अवघे वाव असे तें ।।
कुबेर नाव मोळी पाहे , कैसी वाहे फजिती।।"

नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजिती, नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या! अशी नावे काय कामाची? येथे दोघांनीही भिन्न दाखले दिले असले, तरी विचार एकच दिसतात.

            "चकाकणारे ते सगळे सोने नसते" हे शेक्सपिअरचे सुभाषित आपणास ठावूक आहे, याच थेट अर्थाचे तुकोबांचे एक वाचन आहे "तांबीयाचे नाणे न चाले खऱ्या मोले, जरी हिंडवले देशोदेशी " शेक्सपिअरच्या अनेक नाटकांमध्ये अधीर असणे या दोषामुळे शेक्स्पिअरच्या बऱ्याच पात्रांना अपयश अपयश येते असे दाखवण्यात येते, धीराचे महत्व सांगताना शेक्सपिअर विचारतो कि "असा कोणता घाव आहे कि जो थोडा थोडा भरून न येता एकदम भरून येतो?" अर्थात शेक्सपिअरच्या काळातली युद्ध परिस्थिती तुकारामांच्या काळात नसावी म्हणून धीराचे महत्व वेगळ्या दाखल्याने ते सांगतात "तुका म्हणे धीरा। विण कैसा तो हिरा ।।" येथे हिरा कसा तयार होतो हे जाणणे  आहे. फळाची वाट पाहताना धीर धरावाच लागतो, ते म्हणतात फळ कर्दळी शेवटी येत आहे,  असे शोधिता पोकळी माझी काये। धीर नाही ते वाउगे धीर झाले, फळ पुष्प न यत्न ते व्यर्थ गेले।। उतावीळपणा करून सर्व व्यर्थ जाणार.

              तुकोबांच्या आणि शेक्स्पिअरच्या साहित्यात जाणवणारे साम्य भरपूर आहे, लिहावे तेवढे थोडे आहे. विंदा करंदीकर यांना तर तुकाराम आणि शेक्सपिअर हे जीवाभावाचे मित्र वाटतात. ते एका कवितेत या दोघांची भेटही नाट्यमयतेने घडवतात,


तुकोबांच्या भेटी शेक्सपिअर आला,
तो जाहला सोहळा, दुकानात.
जाहली दोघांची, उराउरी भेट.
उरातले थेट, उरामध्ये.
तुका म्हणे
"विल्या, तुझे कर्म थोर"
"अवघाची संसार, उभा केला"
शेकस्पिअर म्हणे
"एक ते राहिले ,
तुवा जे पहिले, विटेवरी."
तुका म्हणे "ते त्वा बरे केले ;
त्याने तडे केले, संसाराला.
विठ्ठल अट्टल,
त्याची रीत न्यारी;
माझी पाटी कोरी, लिहूनिया.
शेक्सपिअर म्हणे,
"तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले शब्दातीत."
तुका म्हणे
" ऐक, घंटा हि मंदिरी !
गड्या, वृथा शब्दपीठ."
प्रत्येकाची वाट वेगळाली;
वेगळिये वाटे, वेगळाले काटे,
काट्यासंगे पुन्हा तोच."
तुका म्हणे
" ऐक, घंटा हि मंदिरी !
काजगीण घरी, वाट पाहे."