Thursday, November 1, 2012

तुका आभाळाएवढा!

          महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष संत तुकाराम यांचे काव्य म्हणजे मराठी मनासाठी एक चिरंतन अविष्कार आहे. अवघे सतरावे शतक नव्हे, तर  आजपर्यंत या काव्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक दहशतीला हादरा दिलेला आहे. तुकारामांची कविता एका अवरुध्द भावजीवनाची वास्तवपूर्ण अभिव्यक्ती आहे. संत या नात्याने तुकाराम कदाचित मी जरा कमी पाहिले, अर्थात ते थोर महापुरुष होतेच मुळी! पण कवी या नात्याने तुकारामांचे आपल्याला विस्मरण पडणे दुरापास्त आहे. ते आधी कवी होते मग संत! खरे तर ऐसा बंडखोर होणे नाही, कारण तुकारामांच्या काव्यातील वास्तवतेचा स्पर्श इतका प्रभावी आहे की, त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पनांची गडद् नी गूढ आवरणे क्ष किरणांप्रमाणे आरपार छेदून त्यातील विशुध्द मानवता आजही आपल्या नजरे समोर मनोरम स्वरूपात तरंगू लागते. पेशाने वाणी आणि शेतकरी असणाऱ्या या महात्म्याला जगताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. शेती, दुष्काळ, धर्मिक दहशत व घरातून विरोध असो परंतु तुकोबांनी भक्तीचा छंद आणि काव्य रचना सोडली नाही. वेळप्रसंगी तुकारामांनी हाती नांगर धरला, परंतु शेतातील पिकांवर बसणाऱ्या पाखरांना कधी हुसकवले नाही.

        साडे तीनशे-चारशे वर्ष उलटली, तरी आजही त्यांच्या कविता आपल्याला भिडतात, आवडतात, समकालीन वाटतात. त्यांचे काव्य रूढ झालेली मानवी जीवनशैली सूक्ष्मपणे टिपते. या महामानवाने समाजवादात आणि कवितेच्या ताजव्यात स्वतःस झोकून दिले. आणि एक प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती निर्माण केली. सामुहिक मनाची अचूक संवेदना पकडणाऱ्या काव्याला नैतिक परिणाम असल्यामुळे त्याची प्रतिमा अधिकाधिक वृद्धिंगत होताना दिसते. हेच त्यांच्या प्रतिभेच बलस्थान आहे. मुळात कवित्व करणे हि तुकोबांची सहज प्रवृत्ती दिसते. अलंकारीतेचा आश्रय न घेता अगदी रोखठोकपणे तत्कालीन बोलीतल्या अगदी सहज, सुंदर भावपूर्ण शब्दांमध्ये अभिव्यक्ती असल्यामुळे काव्याचा आशय सुलभ आढळतो आणि आपल्याकडून  त्याचे सहज अध्ययन होताना दिसते.  तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ त्यात भावाची आर्द्रता जास्त दिसून येते. जसे पुढील ओळी आपल्याला सहज सांगून जातात
                   
अंतरीचे धावे  स्वभावे बाहिरी, धरती हि परी आवारे ना
 
रचनेत कवीचे मन ओढ घेताना दिसते. कवीचा प्रवास अत्मशोधनासाठी असतो अन त्या अनुषंगाने जीवनशोधाचा. त्याचबरोबर कवीच्या संवेदनशिलतेचाही असतो. आज पहिले तर
विश्वाला घर मानणारे आता उरले नाहीत, असतीलही पण धार्मिक, सांस्कृतिक दहशत थांबवणारे नाहीत. तुकोबांचे समाजाशी, कुटुंबाशी बंद जितके घट्ट झाले, एकबीज झाले, तितकेच प्रभावीशाली काव्य त्यांना स्फुरले. खालील ओळीतून त्यांची महान भक्ती काव्यातून दिसून येते.
                                                
करीतो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥ 
निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हे स्वामी सत्ता ॥ 
तुका म्हणे आहे पाइक चि खरा । वागवितो मुद्रा नामाची हें ॥
माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वभंर बोलवितो ॥


         कला आणि समकालीन संस्कृतीचा एक प्रतीभात्मक संबंध असतो,
तुकोबांची गाथा  एका कवीमनाने कवितेच्या माध्यमातून रचलेल्या व्यापक समग्र सांस्कृतिक जीवनाचे रेखाचित्र आहे. त्यात तात्कालीन समाजाचे प्रतिबिंब आहे. जसे कि निसर्ग, भक्ती, चालीरिती, ग्रामीण विश्व, धार्मिक क्लेश यावर प्रहार , सांस्कृतिक वा सामाजिक ढोंग जातीभेदातून होणाऱ्या शोषणाला विरोध या सर्व गोष्टींचे पडसाद कवितेत उमटले आहेत. तुकोबांच्या भोवताली असलेल्या वास्तवातून, जगण्यातून, चिंतनातून त्यांना पडलेले प्रश्न, गवसलेली वा न गवसलेली उत्तरे त्यांच्या विवेकबुद्धीनी मांडलेली आपल्याला दिसतात. धार्मिक दहशतीला हादरा देताना तुकोबा लिहितात,

मूर्ख भट म्हणे  त्याज्य दिन आज ,
दक्षिणेची लाज बाळ्गेना
कामचुकाराना धार्जिणे पंचांग,
सडलेले अंग संस्कृतीचे
मुहूर्ताचे वेड मूर्खांना शोभते ,
आयुष्य नासते पंचांगाने
चांगल्या कामाला लागावे कधीही ,
गोड फळ येई कष्ट घेता

       एका मुल्याधीनिष्ट जीवन जगणाऱ्या कवीचे हे आत्मकथन आहे. त्यात आंतरिक विकासक्रमाचा आलेख आहे. आत्मिक आणि सामजिक संघर्षाचे अनुभव यात प्रत्यक्षपणे यात उतरले आहेत. तुकोबांची गाथा  अनुभवाधिष्ठिता, संवेदनशीलता,  चिंतनात्मक आत्मकथेचे चित्र आहे. स्वतःच्या काव्यात ते लिहितात

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव। शब्देचि गौरव पूजा करू


       आपणच काय ? खुद्द शिवाजीराजे तुकोबांचे अभंग ऐकायला आतुर असायचे. तुकोबांकडून शिवबाला स्वराज्याची प्रेरणा, आत्मविश्वास अशा गोष्टीची देन झाली. जेव्हा अन्यायविरुद्ध ललकार उठते, जिथ संवेदना मर्यादा ओलांडून समाजाकडे धाव घेतात, संघर्षमय जगणं अन समजवाद डोहासारखा ओसंडून वाहायला लागतो,  जेव्हा छातीचीच ढाल होते अन लेखणीची तलवार होते, सागराएवढी शाई अन आकाशा एवढा कागदही कमी पडू लागतो, तेव्हाच  असे बंडखोर जन्म घेतात.