Wednesday, October 31, 2012

भ्रष्टाचार: कारण व निवारण

        भ्रष्टाचाराचे ग्रहण भारताला लागल्याने, देशाच्या प्रगतीची गती मंदावली आहे, ही वातुस्थिती आहे. आज प्रसारमाध्यमामध्ये, नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल जी चिंता आहे, ती साहजिक आहे. अनेकांची आंदोलने, विरोधी पक्षांचे सत्ताधारयांवर आरोप, आण्णांची उपोषणे, काहींनी तर केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत नवीन पक्ष स्थापन केले, या सर्व गोष्टींनी देश ढवळून निघाला किंबहुना निघत आहे. नेहरुंच्या काळापासुन ते आजतागायत हजारो प्रकरणे कोणी ना कोणी बाहेर आणली आहेत. पुढेही आणली जातील. नर्मदा बचाव ते जैतापुर... एन.जी.ओ. विदेशातुन पैसे घेवून येथील विकास थांबवण्याचे वा त्यात अडथळे आनण्याचे जे देशद्रोही काम करतात... हा भ्रष्टाचार नाही काय? प्रश्न केवळ पक्षांना विरोध करण्याचा नसून भ्रष्ट्यांना खुद्द आरोपाखाली सजा देण्याचा आहे, म्हणून कायदेबदलासाठी आण्णा चौथी-पाचवी टीम बनवत आहेत. परंतु केवळ कठोर कायदे बनवल्याने भ्रष्टाचार थांबेल काय? आज बाकीचे कायदे असून त्यात गुन्हे घडतच आहेत.  जेव्हा पिस्टनवर दबाव आणला जातो, त्याच्या अनेकपट दबावात तो उसळी मारतो, हा भौतिक नियम आहे.


         मागच्या आठवड्यात मी एका सरकारी संस्थेला भेट दिली, तिथल्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या खर्चातून तेथील तंत्रज्ञाची उपकरणे आणली होती, त्या संस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, असे आढळून आले. ती उपकरणे आणण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचे पैसे गेले होते. नंतर तो गेलेले पैसे कुठे न कुठे वसूल करतो. त्यांनी मला हेही सांगितले कि, "हे सरकार नको तिथे जास्त करच करते आणि आण्णा फक्त भ्रष्टाचार.. भ्रष्टाचार.. करतात, त्यामागची कारणे शोधात नाहीत." या शब्दांनी मला विचारात पाडले.

        भ्रष्टाचार का होतो? याची कारणे शोधणे गरजेचे आहे. खरे पाहायला गेले, तर प्रश्न भ्रष्टाचाराचा नसून आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत याचा आहे. स्वतःशी प्रामाणिक नसलेला माणूस खरे तर भ्रष्टच असतो. आणि तो भ्रष्टाचार केवळ पैशांचा करतो असे नाही. स्वतःशी प्रामाणिक न राहणे हे देशाला तर सोडाच पण स्वतःलाही विनाशक आहे. नितीभ्रष्टता नेहमीच स्वविनाशाला जन्म देते. आपला समाज नैतिक भ्रष्टातेच्या चक्रव्युहमध्ये अडकला आहे. आपण भ्रष्ट म्हणून आपण निवडून दिलेले नेते भ्रष्ट! भ्रष्टाचाराची दुसऱ्या शब्दात व्याख्या 'स्वार्थ' होय, हि लोकांची मानसिकताच आहे. उच्च नीतिमुल्ये जेंव्हा बालपणापासुन शिकवली जातात व  साराच समाज जेंव्हा त्या नैतिकतेचा पुरेपुर अनुसरण करत असतो, तेंव्हाच समाज नैतिक होतो.

      हे चित्र बदलायचे असेल, तर कठोर कायद्याची तर गरज आहेच, परंतु हे केवळ संसधेवर टीका करून सिद्ध होणार नाही (संसदेवर टीका करण्याचा हक्कही संसदेनेच दिला आहे, येथे हे लोक विसरतात), तरुणांमध्ये अधिकाधिक प्रबोधनाची गरज भासते आहे. मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, आधी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. वेळप्रसंगी माहितीच्या अधिकाराचे शत्र हाताळले पाहिजे, आपली प्रामाणिक मानसिकता आपण कठोर ठेवली पाहिजे, योग्य नेते पारखून निवडले पाहिजेत, नंतर कुठल्या कायद्याची गरजही पडणार नाही.