Thursday, October 25, 2012

एक आर्त हाक... बाबासाहेब!

    
           बाबासाहेब, आपण जन्मलात आणि थेट सूर्यालाच धराया गेलात! निळ्या आभाळातला सूर्यही अचंबित झाला, आपली ही झेप पाहून! जो सूर्य जातीच्या आणि धर्माच्या गटारात गहाण पडला होता, तो सूर्य आपण अलगद बाहेर काढला आणि आमच्या हवाली केलात! हो, तोच तो आमच्या जगण्याचा सूर्य! आम्ही आमच्याच नशिबाचे उकिरडे उपसत होतो, जातीचे आणि धर्माचे आसूड सहन करीत तळहातावर विजा घेऊन चांदण्यांची झाडे जोपासत होतो. आमचे जगणेच नाकारले होते इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी. बाबासाहेब, आपण आलात आणि आपल्या तडाख्यांनी हे सारे काळे ढग दूर करून स्वच्छ निळे आकाश आम्हाला दिलेत!  आपण आलात आणि आणि साक्षात ब्रम्हाला घाम फुटला, वेदांनी गुडघे टेकले, देवाच्या देवळातले दगडी देवत्व नाकारणारे, ब्रम्हाचे बूड ठेचणारे, राम,कृष्ण आणि देवांचे अस्तित्व नाकारणारे, देवाच्या नावाने दुकान मांडणार्‍यांविरोधात उघड बंडखोरी करणारे आणि त्याच देवाच्या नावातून निघणार्‍या अंधश्रद्धा परंपरांचे साप आपल्या अणुकुचीदार विचारांनी ठेचणारे आपणच बाबासाहेब! पण काय हे? आपली लेकरे आज भरकटत आहेत, तुम्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी ज्या चळवळी उभ्या केल्या, त्या आता बंडखोरी करेनाहिशा झाल्या आहेत. सामाजिक प्रक्रियेतून निर्माण केलेली अस्मिता शाश्वत स्वरूपात ठेवण्यासाठी सुद्धा सामुदायिक पद्धतीने प्रयत्न सुरू असले पाहिजेत. याचा विसर या नेत्यांना पडला आहे, बाबासाहेब...! आज संपूर्ण भारतीय समाजाचे संदर्भ व प्रश्न बदलले आहेत; पण बहुजन चळवळीचा अजेंडा भावनिकतेच्या व आक्रस्ताळेपणाच्या बाहेर यायला तयार नाही, बाबासाहेब..! ना नवीन नेतृत्व तयार होत नाही, न आहे ते  नेतृत्व चळवळीसोबत प्रामाणिक राहत....! चळवळ चालविण्यासाठी संसाधने लागतात उदा. पैसा, ज्ञान, वेळ आणि सामाजिक भांडवल. हे देणार कोण? अशाप्रकारचे सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल) सुस्थितीत असलेला स्तर पुरवू शकतो. सामान्य बहुजनाजवळ हे भांडवल नाही, यामुळेच चळवळीत वर्ग निर्माण झाले! चळवळीस ऐतिहासिक व वर्तमान संदर्भ असतो. तथापि, चळवळीचे पक्षात रूपांतर झाले की चळवळ संपते. चळवळीचे उद्दिष्ट संपले, आवाहन संपले, तर चळवळ संपते. आज नेमके हेच झाले आहे न? लोकांना संघटित करण्याची ताकद संपली आहे, बाबासाहेब...!

              आजही तमाम आव्हाने आणि संकटे आहेत. आपली लेकरे केवळ भावनिक दंगा करीत आहेत. त्याने प्रश्न सुटत नाही. मिळते ते फ़क़्त क्षणिक समाधान! आपला इतिहास विसरतात, ते आपला इतिहास निर्माण करू शकत नाहीत, हे आपले विधानसुद्धा चळवळीतले नेते आणि कार्यकर्तेही विसरलेले दिसतात. आज दलितांची चळवळ ही विचारांची चळवळ राहिली, नसून ती दलालांची चळवळ झाली आहे असे लोक हिणवतात, ते उगीच का, बाबासाहेब? सातत्याने कोणाच्या तरी वळचणीला उभे राहून मिळेल त्यावर समाधान मानण्याची सवय आंबेडकरी चळवळीचा जणू चेहरा बनू पाहात आहे, हे कटुसत्य आहे . आज ही विचारांची नसून दलालांची चळवळ झाली आहे. गरज आहे तिला दलालांपासून वाचविण्याची, हे विदारक वास्तव आहे. आपल्या लेकरांना चळवळीचे, विचारांचे भान द्या, बाबासाहेब..!  तुम्ही झोपलेल्याच्या कानाखाली आवाज काढला, परंतु आता झोपेचं सोंग घेणारयाचे काय करावे, बाबासाहेब ?

           तुमचा जयजयकार करणे आम्हाला राहवत नाही, परंतु म्ही विचारधारा का विसरतो? तुम्ही समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, लोकांची सत्ता आणली.. आम्ही लोकशाही डोक्यावर घेवून नाचू लागलो. परंतु तुमच्या विद्रोहाची धार आज मात्र या लेकरांनी बोथट केली आहे. आपल्या लोकांचा संघटीत होण्याचा तुम्ही सांगितलेला मूलमंत्र विसरले आहेत, तुम्ही त्यागलेली, नाकारलेली वाट यांनी धरली आहे. बाबासाहेब, पुन्हा तुमच्याकडून यांच्या मुस्कटात मारायला तुमच्या बंडखोरीची गरज भासते आहे.