Wednesday, October 31, 2012

भ्रष्टाचार: कारण व निवारण

        भ्रष्टाचाराचे ग्रहण भारताला लागल्याने, देशाच्या प्रगतीची गती मंदावली आहे, ही वातुस्थिती आहे. आज प्रसारमाध्यमामध्ये, नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल जी चिंता आहे, ती साहजिक आहे. अनेकांची आंदोलने, विरोधी पक्षांचे सत्ताधारयांवर आरोप, आण्णांची उपोषणे, काहींनी तर केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत नवीन पक्ष स्थापन केले, या सर्व गोष्टींनी देश ढवळून निघाला किंबहुना निघत आहे. नेहरुंच्या काळापासुन ते आजतागायत हजारो प्रकरणे कोणी ना कोणी बाहेर आणली आहेत. पुढेही आणली जातील. नर्मदा बचाव ते जैतापुर... एन.जी.ओ. विदेशातुन पैसे घेवून येथील विकास थांबवण्याचे वा त्यात अडथळे आनण्याचे जे देशद्रोही काम करतात... हा भ्रष्टाचार नाही काय? प्रश्न केवळ पक्षांना विरोध करण्याचा नसून भ्रष्ट्यांना खुद्द आरोपाखाली सजा देण्याचा आहे, म्हणून कायदेबदलासाठी आण्णा चौथी-पाचवी टीम बनवत आहेत. परंतु केवळ कठोर कायदे बनवल्याने भ्रष्टाचार थांबेल काय? आज बाकीचे कायदे असून त्यात गुन्हे घडतच आहेत.  जेव्हा पिस्टनवर दबाव आणला जातो, त्याच्या अनेकपट दबावात तो उसळी मारतो, हा भौतिक नियम आहे.


         मागच्या आठवड्यात मी एका सरकारी संस्थेला भेट दिली, तिथल्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या खर्चातून तेथील तंत्रज्ञाची उपकरणे आणली होती, त्या संस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, असे आढळून आले. ती उपकरणे आणण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचे पैसे गेले होते. नंतर तो गेलेले पैसे कुठे न कुठे वसूल करतो. त्यांनी मला हेही सांगितले कि, "हे सरकार नको तिथे जास्त करच करते आणि आण्णा फक्त भ्रष्टाचार.. भ्रष्टाचार.. करतात, त्यामागची कारणे शोधात नाहीत." या शब्दांनी मला विचारात पाडले.

        भ्रष्टाचार का होतो? याची कारणे शोधणे गरजेचे आहे. खरे पाहायला गेले, तर प्रश्न भ्रष्टाचाराचा नसून आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत याचा आहे. स्वतःशी प्रामाणिक नसलेला माणूस खरे तर भ्रष्टच असतो. आणि तो भ्रष्टाचार केवळ पैशांचा करतो असे नाही. स्वतःशी प्रामाणिक न राहणे हे देशाला तर सोडाच पण स्वतःलाही विनाशक आहे. नितीभ्रष्टता नेहमीच स्वविनाशाला जन्म देते. आपला समाज नैतिक भ्रष्टातेच्या चक्रव्युहमध्ये अडकला आहे. आपण भ्रष्ट म्हणून आपण निवडून दिलेले नेते भ्रष्ट! भ्रष्टाचाराची दुसऱ्या शब्दात व्याख्या 'स्वार्थ' होय, हि लोकांची मानसिकताच आहे. उच्च नीतिमुल्ये जेंव्हा बालपणापासुन शिकवली जातात व  साराच समाज जेंव्हा त्या नैतिकतेचा पुरेपुर अनुसरण करत असतो, तेंव्हाच समाज नैतिक होतो.

      हे चित्र बदलायचे असेल, तर कठोर कायद्याची तर गरज आहेच, परंतु हे केवळ संसधेवर टीका करून सिद्ध होणार नाही (संसदेवर टीका करण्याचा हक्कही संसदेनेच दिला आहे, येथे हे लोक विसरतात), तरुणांमध्ये अधिकाधिक प्रबोधनाची गरज भासते आहे. मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, आधी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. वेळप्रसंगी माहितीच्या अधिकाराचे शत्र हाताळले पाहिजे, आपली प्रामाणिक मानसिकता आपण कठोर ठेवली पाहिजे, योग्य नेते पारखून निवडले पाहिजेत, नंतर कुठल्या कायद्याची गरजही पडणार नाही.

Thursday, October 25, 2012

एक आर्त हाक... बाबासाहेब!

    
           बाबासाहेब, आपण जन्मलात आणि थेट सूर्यालाच धराया गेलात! निळ्या आभाळातला सूर्यही अचंबित झाला, आपली ही झेप पाहून! जो सूर्य जातीच्या आणि धर्माच्या गटारात गहाण पडला होता, तो सूर्य आपण अलगद बाहेर काढला आणि आमच्या हवाली केलात! हो, तोच तो आमच्या जगण्याचा सूर्य! आम्ही आमच्याच नशिबाचे उकिरडे उपसत होतो, जातीचे आणि धर्माचे आसूड सहन करीत तळहातावर विजा घेऊन चांदण्यांची झाडे जोपासत होतो. आमचे जगणेच नाकारले होते इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी. बाबासाहेब, आपण आलात आणि आपल्या तडाख्यांनी हे सारे काळे ढग दूर करून स्वच्छ निळे आकाश आम्हाला दिलेत!  आपण आलात आणि आणि साक्षात ब्रम्हाला घाम फुटला, वेदांनी गुडघे टेकले, देवाच्या देवळातले दगडी देवत्व नाकारणारे, ब्रम्हाचे बूड ठेचणारे, राम,कृष्ण आणि देवांचे अस्तित्व नाकारणारे, देवाच्या नावाने दुकान मांडणार्‍यांविरोधात उघड बंडखोरी करणारे आणि त्याच देवाच्या नावातून निघणार्‍या अंधश्रद्धा परंपरांचे साप आपल्या अणुकुचीदार विचारांनी ठेचणारे आपणच बाबासाहेब! पण काय हे? आपली लेकरे आज भरकटत आहेत, तुम्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी ज्या चळवळी उभ्या केल्या, त्या आता बंडखोरी करेनाहिशा झाल्या आहेत. सामाजिक प्रक्रियेतून निर्माण केलेली अस्मिता शाश्वत स्वरूपात ठेवण्यासाठी सुद्धा सामुदायिक पद्धतीने प्रयत्न सुरू असले पाहिजेत. याचा विसर या नेत्यांना पडला आहे, बाबासाहेब...! आज संपूर्ण भारतीय समाजाचे संदर्भ व प्रश्न बदलले आहेत; पण बहुजन चळवळीचा अजेंडा भावनिकतेच्या व आक्रस्ताळेपणाच्या बाहेर यायला तयार नाही, बाबासाहेब..! ना नवीन नेतृत्व तयार होत नाही, न आहे ते  नेतृत्व चळवळीसोबत प्रामाणिक राहत....! चळवळ चालविण्यासाठी संसाधने लागतात उदा. पैसा, ज्ञान, वेळ आणि सामाजिक भांडवल. हे देणार कोण? अशाप्रकारचे सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल) सुस्थितीत असलेला स्तर पुरवू शकतो. सामान्य बहुजनाजवळ हे भांडवल नाही, यामुळेच चळवळीत वर्ग निर्माण झाले! चळवळीस ऐतिहासिक व वर्तमान संदर्भ असतो. तथापि, चळवळीचे पक्षात रूपांतर झाले की चळवळ संपते. चळवळीचे उद्दिष्ट संपले, आवाहन संपले, तर चळवळ संपते. आज नेमके हेच झाले आहे न? लोकांना संघटित करण्याची ताकद संपली आहे, बाबासाहेब...!

              आजही तमाम आव्हाने आणि संकटे आहेत. आपली लेकरे केवळ भावनिक दंगा करीत आहेत. त्याने प्रश्न सुटत नाही. मिळते ते फ़क़्त क्षणिक समाधान! आपला इतिहास विसरतात, ते आपला इतिहास निर्माण करू शकत नाहीत, हे आपले विधानसुद्धा चळवळीतले नेते आणि कार्यकर्तेही विसरलेले दिसतात. आज दलितांची चळवळ ही विचारांची चळवळ राहिली, नसून ती दलालांची चळवळ झाली आहे असे लोक हिणवतात, ते उगीच का, बाबासाहेब? सातत्याने कोणाच्या तरी वळचणीला उभे राहून मिळेल त्यावर समाधान मानण्याची सवय आंबेडकरी चळवळीचा जणू चेहरा बनू पाहात आहे, हे कटुसत्य आहे . आज ही विचारांची नसून दलालांची चळवळ झाली आहे. गरज आहे तिला दलालांपासून वाचविण्याची, हे विदारक वास्तव आहे. आपल्या लेकरांना चळवळीचे, विचारांचे भान द्या, बाबासाहेब..!  तुम्ही झोपलेल्याच्या कानाखाली आवाज काढला, परंतु आता झोपेचं सोंग घेणारयाचे काय करावे, बाबासाहेब ?

           तुमचा जयजयकार करणे आम्हाला राहवत नाही, परंतु म्ही विचारधारा का विसरतो? तुम्ही समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, लोकांची सत्ता आणली.. आम्ही लोकशाही डोक्यावर घेवून नाचू लागलो. परंतु तुमच्या विद्रोहाची धार आज मात्र या लेकरांनी बोथट केली आहे. आपल्या लोकांचा संघटीत होण्याचा तुम्ही सांगितलेला मूलमंत्र विसरले आहेत, तुम्ही त्यागलेली, नाकारलेली वाट यांनी धरली आहे. बाबासाहेब, पुन्हा तुमच्याकडून यांच्या मुस्कटात मारायला तुमच्या बंडखोरीची गरज भासते आहे.

Thursday, October 18, 2012

दहशतवाद


        दहशतवादामुळे  जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी असल्या तरी आज या आपल्या विनाषाच्या बनून बसल्या आहेत काय?   ज्ञान-विज्ञानांत आपल्या समाजव्यवस्थाच्या परीघामध्ये कतीही प्रगती केली असली, तरी हिसंक आणि वर्चस्ववादी भावना थांबवण्यात आधुनिक समाजाला मिळालेले अपयश, धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज बाबत आपली अयोग्य विचारधारा या सर्व कारणांमुळे दहशतवादाला मिळणारे खात-पाणी हे आजचे जगासामोरचे सर्वात मोठे संकट आहे. दहशतवादात फक्त हिंसा होत नसते, तर शक्य त्या मार्गाने लोकांच्या मनात एखाद्या गोष्टींबद्दल भीती निर्माण करणे, त्यांची विचारधारा स्वतःकडे गहाण ठेवणे, स्व:हीताच्या रूढी-परंपरामध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करणे ई. रिक्षावाला ५० रुपयांऐवजी ७० रुपये बिल घेईन याची धास्ती मनात असणे हे दहशतवादाचेच उदाहरण आहे. भीती म्हणजेच दहशत!

       हिंसक दहशतवादाचा नाश प्रतिहिंसेने करावा अशी धारणा की सामाजिक घटकांवर पडत आहे, हि मानसिकता दहशतवादाचा नाश कधीही करू शकणार नाही, हे समीकरण बऱ्याच विचारवंतांनी मांडले आहे. तरीही काही सनातनी संघटना याच मार्गाने पुढे जाताना दिसतात, हि आपल्यासमोर चिंतेची गोष्ट आहे. एखादी हिंसक घटना झाली कि लोक जागे होतात, दहशतवाद्यांच्या धर्मावर तोंडसुख घेतले जाते. काही स्तरावर समाज ढवळून निघतो हे नैतिक आणि सामाजिक चूक भासते आहे. धर्मद्वेष, संस्कृतीद्वेष, राष्ट्रद्वेष, भाषाद्वेष, प्रांतद्वेष या बाबी  मानवी समूहाला कधी तारू शकत नाहीत. अर्थात समाजाला न तारणारी भावना, वर्चस्ववाद, दडपशाही या सर्वांपासून मानवी समाज जो अवहेलना सहन करतो त्याला दहशतवाद म्हणता येईल. 

       भारतात मानवी जीवनावर धार्मिक दहशतवाद खूप बिंबवला जातो, हा  दहशतवाद प्राचीन आहे तेव्हापासून, जेव्हा सिंधू संस्कृती, द्रविड कर्मकांड लयास गेले. शुद्र, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे मानवी वर्गीकरण म्हणजे दहशत आहे हि सांगण्याची गरज नाही. याउपर आपल्या पुरोगामी इतिहासाला काही वळणांवर चुकीचे रूप देवून बहुजणांचे मेंदू, विचारधारा, संस्कृती व  प्रगतीवादी भावना आपल्याकडे गहाण ठेवली त्यासाठी अनेक काल्पनिक कथाही इतिहास म्हणून रंगवल्या गेल्या. शुद्रांनी सनातन्यांच्या भानगडीत पडू नये हा संदेश दहशतवादानेच दिला.

          इस्लाम दहशतवाद हा केवळ अमेरिकेच्या वर्चस्ववादी धारणेतून दिसून येतो. जगात मुस्लीम राष्ट्रे भरपूर आहेत, त्यांचे संघटीकीकरण अमेरिकी वर्चस्ववादाला धोक्याचे ठरू शकते. म्हणून  एका इस्लाम राष्ट्राला अंतरराष्ट्रीय स्तरावर मदत करणे, तर दुसऱ्या इस्लाम राष्ट्राशी दहशत माजवण्या इतपत द्वेष करणे हे अमेरिकेचे धोरण दिसते. पहिल्या वा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेची वर्चस्ववादी भूमिका कोण विसरेल ? याबाबत हिरोशिमा आणि नागासाकी शहरांची अवहेलेनेचा इतिहास आपल्याला सर्व सांगून जातो.  अमेरिका हे सर्वात दहशतवादी राष्ट्र आहे असेही आरोप काही प्रख्यात विचारवंतांचे आहेत. मात्र ज्यू धर्म हा इस्लाम धर्माचा दाता आहे. इस्लाम धर्मचा मुळ शत्रू ज्यू वा ख्रिस्ती दिसतो. इस्लाम दहशतवादी हल्ल्यांमध्ये ख्रिस्ती किंवा ज्यू टारगेट केले आहेत. भारतात हल्ले करण्यामागचा यांचा उद्धेश म्हणजे भारताची अंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन व्हावी. काही ठिकाणी तर चक्क मुस्लीमहि मारले गेलेत. काश्मीर बाबत हा त्यांचा प्रांतिय दहशतवाद आहे. इस्लाम दहशतवाद भारताविरुद्ध म्हणता येईल, हिंदुविरोद्धी नव्हे. परंतु भारतातील हिंदू संघटना मात्र याचा अपप्रचार करतात आणि धार्मिक द्वेषाच्या दंगली आणि मुस्लीम राहणाऱ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणतात.   उदा. अयोध्या मंदिर-मशीद दंगल, गुजरात गोध्रा हत्याकांड, समझोता एक्स्प्रेस बोम्बस्पोट, मालेगाव बोम्बस्पोट, हैद्राबाद, नांदेड बोम्बब्लास्ट ई. हा भारतासमोर मोठा प्रश्न आहे. या व्यतिरिक्त माववादी, शिखांकडूनहि दहशतवादी कारवाया घडता आहेत. माववादी हे आदिवाशी असून हक्कासाठी बंदूक हाच त्यांचा मार्ग दिसतो. त्यांना दहशतवादी म्हणता येईल का, हा प्रश्न आहे.

        या व्यतिरिक्त पंढरपुराच्या मंदिरात होणारा पंथीय दहशतवाद, राजकीय स्तरांवर पैशाच्या आधारे राजकीय दहशतवाद, भ्रष्टाचारातून आर्थिक दहशतवाद, राजकीय भाषणातून टिंगल वा नकला करणे वा भाषिक दहशतवाद, साहित्यातून जातीय दहशतवाद वा सांस्कृतिक दहशतवाद अशी काही राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या दहशतवादाची उदाहरणे आहेत. दहशतवादाची बीजे प्राचीन काळात रुजली आहेत, त्याचे हे पडसात आहेत. जातीद्वेष, संस्कृतीद्वेष, जातीद्वेष, धर्मद्वेष, राष्ट्रद्वेष, प्रांतद्वेष, भाषाद्वेष व वर्चस्ववादी भावना जो पर्यंत नाश पावत नाही तो पर्यंत दहशतवाद नष्ट होणार नाही.