Wednesday, September 19, 2012

गुलामगिरी

        रूमचा दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला, काही मुलांचा एक समूह दारात उभा होता. त्यामधील काहींच्या तोंडात गुटखा होता, त्यातला एकजण धुवून वाळत घातलेल्या माझ्या शर्टला धरून उभा होता, मी पटकन ओरडलो 'अहो, शर्ट सोडा धुतलेला आहे तो!'. त्याच्या हाताने अस्वछ झालेला भाग साफ करत मी पुन्हा शर्ट वाळायला टाकला.
' हम्म, बोला!'
'वर्गणी..' एकजण म्हणाला.
'अच्छा, कधी आहेत गणपती ?'
'१९ तारखेला.'
'बरं!'
मी माझ्या खिशात हात घालत, ५१ रुपये काढले.. 'हे घ्या!'
'अहो, २५१ ची पावती फाडावी लागेल..'
'असं कसं? मी एवढेच देवू शकतो.'
'नाही हो, हे बघा सर्वांनी २५१ ची पावती फाडली आहे.' पावती पुस्तकवाला म्हणाला.
मी बराच वेळ नाही म्हणत बसलो...
परंतु, शेवटी ते १०१ रुपयांवर आले.
तरीही त्यांनी जबरदस्तीच १०१ रुपयांची पावती फाडून माझ्या खिशात घातली...
आणि जमेल तेव्हा पैसे द्या म्हणाले.
पुन्हा १८ तारखेला सर्वजण आले. आणि १०१ रुपये मागू लागले..
'तुम्ही आज पैसे देणार होता.'  एकजण म्हणाला.
'मी ५१ रुपयेच देवू शकतो.'
'नाही.. नाही.. तुम्ही १०१ रुपयाची पावती फाडली आहे. १०१ रुपयेच द्यावे लागतील नाही, तर बाकीचे सर्व एवढेच पैसे देतील.'
असे बराच वेळ  नाही-द्या, नाही-द्या झाले.
शेवटी मी कंटाळून १०० रुपये दिले आणि सही केली.
जाता जाता एकजण बारीक आवाज आला, 'तरी एक रुपया ठेवलाच..!'

आता १९ तारीख आली होती.. ढोल-ताशा, डॉल्बीचा आवाज येत होता... आज सुट्टी असल्यामुळे मी आणि माझा भाऊ रूमवरच होतो. गणपतीची मिरवणूक जवळ आली होती.. रुमजवळ! सर्व मुले-मुली बेदुंध होवून नाचत होती, भलते-सलते चेहऱ्यावर हावभाव आणत होती, गुलाल उधळत होती, ते दृश्य पाहून कुणालाही अशा संस्कृतीची लाज वाटल्याखेरीज राहणार नाही. गणपतीकडे कोणाचच लक्षच नव्हतं. चिकणी चमेली, हलकट जवानी, मुन्नी बदनाम हुई... अशी गाणी मोठ्या आवाजात चालू होती! त्याबरोबर ढोल-ताशाचा आवाज मात्र मोठ्याने चालू होता..
तेव्हा मला जरा संत कबीर आठवले...

काकर पाखर जोडके मस्जिद लयी चुनायी,
ता चड मुल्ला बांग दे, बहिरे भई खुदाई।

तो ध्वनिक्षेपक नव्हता, तरीदेखील मोठ्या आवाजात भांग देणा-या मुलाला संत कबीरांनी असा रोखठोक प्रश्न केला होता .. एवढी यातायात का करतोस? देव बहिरा आहे का? मंदिरे, उत्सव यांत चाललेला सध्याचा गोंगाट ऐकला, तर देव निश्चित बहिरा आहे, असे वाटते! तसेच आज काही या बहिऱ्या गणपतीसमोर चालू होतं.
हे सर्व पाहवत नव्हतं. ज्याला हे पुजत होते, तो गणपती तरी होता काय? खरचं, गणपतीला हत्तीचं मस्तक होतं काय?  गणपतीचा आणि हत्तीचा रक्तगट जुळला तरी कसा? असे सोपे सोपे प्रश्न त्यांना कधीच पडले नव्हते. याचा अर्थ ज्यांना आपला पुरोगामी इतिहासच माहित नाही, त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित करायचं?

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला चाललो होतो, गणपतीसमोरून जाताना एकजण प्रसाद द्यायला आला..
म्हणाला 'प्रसाद घ्या.'
'तुमचा देव खात नाही का?' मी म्हणालो.
त्यानं प्रसाद देवून, तो हसून माघारी फिरला पण त्यांन यावर विचार केला नाही... याचीच खंत आजवर कबिरांना असावी...
म्हणून मला पुन्हा कबीर आठवले..

पत्थर पूजे हरी मिलें, तो मैं पुजू पहाड़ |
यासे तो चाकी भली, जिका पिसा खाए संसार |

दगड पुजून जर देव भेटत असेल, तर मी अख्खा पर्वत पूजेन, असे ते म्हणतात. बनबरे सरांनी संपादन केलेला महात्मा फुलेंचा 'गुलामगिरी' ग्रंथ वाचून खूप दिवस झाले होते. तो ग्रंथ वाचून अक्षरश: मी वेडा झालो !  या लोक्कांना हे मी कसं सांगू? या ग्रंथाबद्दल मला अजूनही कळत नाही.  इतका अप्रतिम ग्रंथ आहे हा! फुलेंनी यात सर्व दैवी भाकडकथांचा आणि ब्राह्मणी कल्पनांचा पर्दाफाश केला आहे!  हातात प्रसाद धरून, आमच्या हजारो वर्षाच्या 'गुलामगिरी'चा विचार करत मी ऑफिसला गेलो.