Tuesday, September 25, 2012

असुरवेद

        मी आवरजुन वाचलेली कादंबरी म्हणजे 'असुरवेद'! सं. दे. सोनवणी लिखित ही एक थरारक कादंबरी होय. कादंबरी वाचायला घेतली आणि स्वतःला हरवून बसलो, अशी थराररकता यात जाणवली. अर्थात, मी कोणी समीक्षक नाही, मी एक वाचक म्हणून इथे बोलत आहे. समाज्याच्या दृष्टीने पाहिले, तर सामजिक प्रश्नावर भूमिका मांडणारे लेखक फार असतात, परंतु याच समाजकारणी लेखाकातून निवडायचे झाले, तर कादंबरीकार फार कमी सापडतात. आजचे इतिहासाबद्दलचे वाद, एक उच्च वर्णीय समाज आणि एक हीन समजला जाणारा समाज अशी तफावत कशासाठी? हे या कथेतून स्पष्ट झालेले दिसते.

        इतिहास हा माणसांनीच घडवला आणि इतिहास लिहिणारादेखील माणूसच होता. इतिहासाचे झालेले लिखाण हे एका विशिष्ठ समाजाने स्व:हिताच्या दृष्टीकोनातून केले, इतिहासात झालेली घुसखोरी, आणि इतिहासाच्या संशोधनात आलेले वेगवेगळे प्रसंग हे या कादंबरीची थरारकता वाढवतात. ही थरारकता जशी पडद्यावर दिसते, तसेच चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहू लागते. इतिहास संशोधनात झालेली पळवापळवी, आणि जणू इतिहासाचच जणू लिलाव वैदिक लोकानी कसा केला, हे लेखकांनी कथात्मक मांडले आहे. शैव धर्माचा ऱ्हास, हिंदू धर्म, ब्राह्मणी कल्पणा, सिंधू संस्कृती, मुर्तीपुजकांचा समाज या सर्व गोष्टींवर एका रहस्यमय नजरेतून प्रकाश टाकला आहे. यातून कादम्बरीतील पात्रे थाराररकतेची रंगत वाढवतात, दोन-तीन  प्रसंग तर इतक्या रमणीय टोकाला घेवून जातात, कि आपल्या स्व:तालाच कथेचे एक पत्र व्हावासे वाटून, कथेत झेप घेवून पुढील रहस्यांचे उलघढे काय आहेत, ते जाणून घ्यावेसे वाटते. अर्थात कथेत पुढे काय आहे? ही जाणून घेण्याची उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरली आहे.

         वेद फ़क्त चार नव्हेत, तर त्या काळी असुरवेद, पिशाच्चवेद, गन्धर्ववेद आणि सर्पवेद असे अजुनही वेद होते, असे आपल्याला गोपथ ब्राह्मणावरुन कळते. उपनिशदांपैकी मुख्य ५२ उपनिषदे अथर्ववेदांवर आधारीत आहेत आणि त्यात आत्म्याचे अजरामरत्व, त्यागाची महत्ता, योग आणि अद्वैताची महती गायली गेली आहे. हे इथे स्पष्ट होते. हे नमूद करताना लेखकाने संशोधनात कशी घुसखोरी होते, त्याचे थरारक नाट्य आपल्या डोळ्याच्या पडद्यासमोर उभा केले आहे आणि वाचकांना यावर चिंतनही करायले लावले आहे, हे कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे.

Wednesday, September 19, 2012

गुलामगिरी

        रूमचा दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला, काही मुलांचा एक समूह दारात उभा होता. त्यामधील काहींच्या तोंडात गुटखा होता, त्यातला एकजण धुवून वाळत घातलेल्या माझ्या शर्टला धरून उभा होता, मी पटकन ओरडलो 'अहो, शर्ट सोडा धुतलेला आहे तो!'. त्याच्या हाताने अस्वछ झालेला भाग साफ करत मी पुन्हा शर्ट वाळायला टाकला.
' हम्म, बोला!'
'वर्गणी..' एकजण म्हणाला.
'अच्छा, कधी आहेत गणपती ?'
'१९ तारखेला.'
'बरं!'
मी माझ्या खिशात हात घालत, ५१ रुपये काढले.. 'हे घ्या!'
'अहो, २५१ ची पावती फाडावी लागेल..'
'असं कसं? मी एवढेच देवू शकतो.'
'नाही हो, हे बघा सर्वांनी २५१ ची पावती फाडली आहे.' पावती पुस्तकवाला म्हणाला.
मी बराच वेळ नाही म्हणत बसलो...
परंतु, शेवटी ते १०१ रुपयांवर आले.
तरीही त्यांनी जबरदस्तीच १०१ रुपयांची पावती फाडून माझ्या खिशात घातली...
आणि जमेल तेव्हा पैसे द्या म्हणाले.
पुन्हा १८ तारखेला सर्वजण आले. आणि १०१ रुपये मागू लागले..
'तुम्ही आज पैसे देणार होता.'  एकजण म्हणाला.
'मी ५१ रुपयेच देवू शकतो.'
'नाही.. नाही.. तुम्ही १०१ रुपयाची पावती फाडली आहे. १०१ रुपयेच द्यावे लागतील नाही, तर बाकीचे सर्व एवढेच पैसे देतील.'
असे बराच वेळ  नाही-द्या, नाही-द्या झाले.
शेवटी मी कंटाळून १०० रुपये दिले आणि सही केली.
जाता जाता एकजण बारीक आवाज आला, 'तरी एक रुपया ठेवलाच..!'

आता १९ तारीख आली होती.. ढोल-ताशा, डॉल्बीचा आवाज येत होता... आज सुट्टी असल्यामुळे मी आणि माझा भाऊ रूमवरच होतो. गणपतीची मिरवणूक जवळ आली होती.. रुमजवळ! सर्व मुले-मुली बेदुंध होवून नाचत होती, भलते-सलते चेहऱ्यावर हावभाव आणत होती, गुलाल उधळत होती, ते दृश्य पाहून कुणालाही अशा संस्कृतीची लाज वाटल्याखेरीज राहणार नाही. गणपतीकडे कोणाचच लक्षच नव्हतं. चिकणी चमेली, हलकट जवानी, मुन्नी बदनाम हुई... अशी गाणी मोठ्या आवाजात चालू होती! त्याबरोबर ढोल-ताशाचा आवाज मात्र मोठ्याने चालू होता..
तेव्हा मला जरा संत कबीर आठवले...

काकर पाखर जोडके मस्जिद लयी चुनायी,
ता चड मुल्ला बांग दे, बहिरे भई खुदाई।

तो ध्वनिक्षेपक नव्हता, तरीदेखील मोठ्या आवाजात भांग देणा-या मुलाला संत कबीरांनी असा रोखठोक प्रश्न केला होता .. एवढी यातायात का करतोस? देव बहिरा आहे का? मंदिरे, उत्सव यांत चाललेला सध्याचा गोंगाट ऐकला, तर देव निश्चित बहिरा आहे, असे वाटते! तसेच आज काही या बहिऱ्या गणपतीसमोर चालू होतं.
हे सर्व पाहवत नव्हतं. ज्याला हे पुजत होते, तो गणपती तरी होता काय? खरचं, गणपतीला हत्तीचं मस्तक होतं काय?  गणपतीचा आणि हत्तीचा रक्तगट जुळला तरी कसा? असे सोपे सोपे प्रश्न त्यांना कधीच पडले नव्हते. याचा अर्थ ज्यांना आपला पुरोगामी इतिहासच माहित नाही, त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित करायचं?

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला चाललो होतो, गणपतीसमोरून जाताना एकजण प्रसाद द्यायला आला..
म्हणाला 'प्रसाद घ्या.'
'तुमचा देव खात नाही का?' मी म्हणालो.
त्यानं प्रसाद देवून, तो हसून माघारी फिरला पण त्यांन यावर विचार केला नाही... याचीच खंत आजवर कबिरांना असावी...
म्हणून मला पुन्हा कबीर आठवले..

पत्थर पूजे हरी मिलें, तो मैं पुजू पहाड़ |
यासे तो चाकी भली, जिका पिसा खाए संसार |

दगड पुजून जर देव भेटत असेल, तर मी अख्खा पर्वत पूजेन, असे ते म्हणतात. बनबरे सरांनी संपादन केलेला महात्मा फुलेंचा 'गुलामगिरी' ग्रंथ वाचून खूप दिवस झाले होते. तो ग्रंथ वाचून अक्षरश: मी वेडा झालो !  या लोक्कांना हे मी कसं सांगू? या ग्रंथाबद्दल मला अजूनही कळत नाही.  इतका अप्रतिम ग्रंथ आहे हा! फुलेंनी यात सर्व दैवी भाकडकथांचा आणि ब्राह्मणी कल्पनांचा पर्दाफाश केला आहे!  हातात प्रसाद धरून, आमच्या हजारो वर्षाच्या 'गुलामगिरी'चा विचार करत मी ऑफिसला गेलो.
Sunday, September 9, 2012

प्रतिसरकार - वेड स्वातंत्र्याचे!

       स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील याची प्रतिसरकार चळवळ जोरात चालू होती. शांततामय अहिंसात्मक चळवळ चीरुडून टाकण्यासाठी इंग्रज पोलिसी अत्याचार सुरु होते. 'जशाच तसे' या न्यायाने क्रांतिकारांनी ही सशस्त्र चळवळ सुरु केली होती. सर्वत्र धरपकड सत्र सुरु होते. भूतपूर्व मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या नेतृवाखाली क्रांतीकारांचा एक गट दक्षिण सातारा-सांगली भागात कार्यरत होता.   
                                                                                                
प्रतीसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह
 नाना पाटील
 
  सांगलीमधील फौजदार गल्लीत क्रांतीकारकांची एक खोली होती. क्रांतीकारकांना लागणारी शस्त्रे, पिस्तुले, काडतुसे, हैड्ग्रेनेटस, इतर शस्त्रास्त्रे तेथे ठेवली जात असत. त्याचा सुगावा पोलिसांना लागला. सातारचे डी. वाय. एस. पी. श्री. मोडक यांनी २१ जून १९४३ च्या रात्री १२/१ वाजता खोलीला वेढा घातला. खोलीला बाहेरून कड्या घालून आतील शस्त्रास्त्रे, स्फोटके बाहेर टाकण्यास सांगून खोलीत प्रवेश केला. नंतर वसंतदादा पाटील, येडे निपानीचे हिंदूराव पाटील, कोल्हापूरचे जयराम बेलवलकर, कागलचे वसंतराव सावंत, कुर्लीचे मारुतराव आगलावे आदी क्रांतीकारकांना सांगली जेलमध्ये अटक झाली. (हिंदुराव पाटील म्हणजे प्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांचे बंडू होत.) सांगली जेलमध्ये जयराम कुष्टे, गणपतराव कोळी, बाबुराव जाधव, आण्णा पत्रावळे, जिनपाल खोत असा सोळा क्रांतिकारकांचा ग्रुप होता.

         सांगली तुरुंगु अभेद्य असा होता. जेलच्या तिन्ही बाजूंना मोठे तट व बुरुज होते. तटाभोवती पाण्याचा खोल खंदक होता. पश्चिमेला पोलीस ठाणे होते. दक्षिणेला घोड्यांचा रिसाला होता. पूर्वेला पोलिसांच्या क्वोटर्स होत्या. क्रांतिकारकांच्या खोलीत पिस्तुले, काडतुसे, हैड्ग्रेनेटस आणि रेल्वे गाड्या पाडण्याची साधनं होती. अधिक माहितीसाठी हे क्रांतिकारक पोलिसांच्या ताब्यात असणं गरजेच होतं.  साताऱ्याचे डी.एस. पी. गिल्बर्ट होते. ते क्रांतिकारकांचे कर्दनकाळच होते.

     त्यांच्या हाती लागण्यापूर्वी जेल फोडून पलायन करायचा बेत वसंतदादांनी निश्चित केला. शनिवारी हा सांगली येथील बाजाराचा वार होता. त्या दिवशी सर्वजण बाजाराच्या गडबडीत असतात. अगदी पोलीससुद्धा बाजाराच्या गडबडीत असतात. वसंतदादांचा खटला त्याच दिवसी सुरु होणार होता. त्यांनी वकिलामार्फत तारीख बदलून पुढे घेतली होती. पोलिसांना दुपारी बाजाराला जायचं होतं. त्यामुळं वसंतदादांनी हिंदुराव पाटील यांना त्यापूर्वी बाथरूमला नेलं. पत्रावळेही बाथरूमला आले. दुपारी अडीच तीनच्या तुरुंग फोडून पाळायचा निश्चय त्यांनी केला. बाजाराची वेळ असल्यामुळं किल्ल्या हवालदाराकडे देवून पोलीस निघून गेले. पहारयातील एकच पोलीस तिथ होता. दुसऱ्या बराकीतील क्रांतीकारकांना पोलिसाने बाथरूमहून आणले ही संधी साधून वसंतदादांनी पहारेकऱ्याला जोरात मिठी मारली व हिंदूरावांनी त्याच्या खिशातील काडतुसे काढून घेतली. बंदूक हिसकावून त्यात काडतुसे भरली. काडतुसे भरलेली बंदूक घेवून हिंदुरावांनी पळत जावून गेटवरच्या बेसावध पोलिसांवर रोखली. पत्रावळे आणि वसंतदादाही गेटकडे गेले. तेथील एका पाहरेकरयाची बंदूक हिसकावून घेतली. गेटवरील १६ पोलिसांना 'जैसे थे' उभे राहायला सांगितले, नाही तर गोळ्या घालायची धमकी दिली. वसंतदादा व इतर चौदा स्वातंत्र्य-सैनिकांनी बंदुकासह तटावरून खंदकात उड्या मारल्या व भर बाजारातून बंदुका घेवून पळू लागले. हिंदुराव पाटील यांची चुकून दगडावर पडली. त्यात त्यांचे दोन्ही पाय दुखावले. अधू झाले.

     जेलमधील पोलिसांनी शिट्ट्या वाजवून धोक्याचा इशारा दिला. घोडेस्वार पोलिसांनी क्रांतिकारकांचा पाठलाग सुरु केला. पाऊस पडल्यामुळ रस्ता निसरडा झालेला होता. त्यामुळे क्रांतीकारकांना बंदुका घेवून पळणे अवघड होते. तरी ते पुलाकडे पळत होते. कृष्णा नदीला महापूर आलेला होता. बाबूराव जाधवांनी 'वंदे मातरम' अशी घोषणा देवून चाळीस फुटावरून कृष्णेच्या पुरात उडी मारली. पुलावरूनच पोलिसानी जाधवांचा बंदुकीन अचूक भेद घेतला. बाबुराव जाधव हुतात्मा झाले. पत्रावळे सांगालवाडीच्या हरीपुरकडे पळत असताना पोलिसांनी चिखलामध्ये एकाकी गाठून त्यांना गोळी घातली. 'भारत माता कि जय' म्हणून तेही शहीद झाले.

      आता सर्व कृष्णा-वारणा संगमावरील झाडांआडून बचावाची भूमिका घेऊन पोलिसांशी लढत होते. वसंतदादांनी उंबराच्या झाडाच्या आश्रयाने पोलिसांशी बंदुकीनं सामना चालू ठेवला. झटापटीत वसंतदादांचा खांदा झाडाबाहेर आलेला पाहून एका पोलिसाने त्यांचा अचूक भेद घेतला. खांदा विदीर्ण होताच दादा बेशुद्ध पडले. तिसरा क्रांतिकारक बळी पडला असे समजून पोलिसांनी पुरात होड्या सोडल्या. जखमी वसंतदादा आणि हिंदुराव पाटील यांना उपचाराकरिता  दवाखान्यात पोहचवले. गणपत कोळी, मारुती आगलावे, सातलिंग शेते, जयराम कुष्टे, महादेव बुटाले, विठ्ठल शिंदे यांना बेड्या ठोकून जेलबंद केले. त्यांवरील खटले कोर्टात न चालवता जेलमध्ये चालवले. सर्वांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली. १९४६ साली त्यांची सुटका झाली. बाबुराव जाधव आणि पत्रावळे हे दोघेही क्रांतिकारक मातृभूमीसाठी शहीद झाले. 

कर्मवीर भाऊराव पाटील व
क्रांतिसिंह नाना पाटील
       अशा क्रांतीवीरांची अनेक नावे सांगता येतील. नागनाथ आण्णा नायकवडी अतिशय धाडशी वृत्तीचे आणि धडाडीचे क्रांतिकारक होते. त्यांना 'प्रतीसरकारचा ढाण्या वाघ' असे संबोधले जायचे. नायकवडी आण्णा अत्यंत जहाल आणि कृतीशील होते. कामिरीचे एस. बी. पाटील, वाटेगावचे बेर्डे गुरुजी हे आण्णांचे मुख्य साथीदार होते. बांगर गुरुजी, बलदेवसिंग, पांडू मास्तर, भाई विभूते, कोम्रेडे छन्नुसिंह चंदेले, किसान वीर, जी. डी. उर्फ बापूसाहेब लाड, बाबुराव जगताप, उंडाळकर पाटील, दिनकर आबा, आप्पासाहेब लाड, घोरपडे मास्तर (किती नावे घ्यावी?) यांनीही प्रतिसरकार चळवळीतून स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. या सर्वांना कर्मवीर भाऊराव पाटील व प्रतीसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचं योग्य मार्गदर्शन होतं. दिवस-रात्र न पाहता हे सर्व क्रांतिकारक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात इंग्रजांना शह देत धावले. काहींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, काही अर्धेमेले झाले तर काहींना वेढ लागलं. हो, स्वातंत्र्याचं वे!   
  
      विशेष म्हणजे, हा लोकलढा, 'प्रतीसरकार'चं उभं करणारे सगळे मातीचे अस्सल भूमिपुत्र होते. सामान्य शेतकरी होते. हे सच्चे देशभक्त होते. आतून बाहेरून मायभूमीशी एकनिष्ठ होते. आजही हे सर्वजण अमर आहेत!

आभार:- जिजाऊ प्रकाशन, पुणे.