Saturday, July 21, 2012

एक पत्र...

       प्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि  इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण करावे. फक्त शालेय शिक्षणा-व्यतिरिक्त आपल्या पाल्याने सामाजिक,  व्यावहारिक ज्ञानही आत्मसात करावे. हे विश्व जितके सुंदर आहे तितका त्याचा आनंद घ्यावा, याला अनुसरून तशी प्रेरणा स्वतःमध्ये भरून घ्यावी. आयुष्यातील चढ-उतरांशी तोंड सर्वांनाच द्यावे लागते, याची जान करून देणारे आणि मला आवडणारे एक पत्र... हे पत्र अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हेड-मास्तरांना लिहिले होते...

प्रिय गुरूजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात;  नसतात सगळीच सत्यनिष्ठ!
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी!
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही!
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही!
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!

मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला!
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष-मत्सरा-पासून दूर रहायला शिकवा.
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला.
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं ,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा.
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं,

शाळेत त्याला हा धडा मिळू दे.
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा.
त्यानं बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.

माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी .
पुढे हे ही सांगा त्याला,
ऎकावं जनांचं, अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून,
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा-
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला.
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस!
त्याला शिकवा,
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.

त्याला हे पुरेपुर समजावा, की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून ….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा!

धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका .
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य!
आणखीही एक सांगत रहा त्याला,
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.

माफ करा, गुरुजी! मी फार लिहितो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य करा!
माझा मुलगा-
भलतंच गोड लेकरु आहे हो!
----अब्राहम लिंकन                            

(हे मुळ पत्र इंग्लीश आहे, त्याचे प्रथम मराठी भाषांतर वसंत बापट यांनी केले.)

Thursday, July 5, 2012

साहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे

        आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या?  कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे  सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. त्यावेळी मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी  काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज,  कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या  काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले.

      अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, कृष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा कथा संग्रह आण्णाभाउंनी प्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीत मृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमी मावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली.  अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर,  कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

     सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्त साहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो, उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात. 
 
Published in Dainik Pandhari Varta Pandharpur and Dainik Surajya, Solapur. (1 Aug 2018 - on the occasion of birth anniversary of Annabhau Sathe.  )