Friday, June 8, 2012

रानातली कांदाभाकर रानातच राहिली...!आज जेवण करूनही भूक नाही भागली...
रानातली कांदाभाकर रानातच राहिली...!

व्यवसायाच्या दुनियेत सैरावैरा धावावं लागलं....
घडाळाच्या काट्यालाच पाय बांधावं लागलं...
पैशाचाच दास म्हणून राहावं लागलं...
इमारतींच्या जंगलात घर शोधावं लागलं...
अन, मग त्याला आपलंस करावं लागलं..
आयुष्याच्या गणितात शून्यानं भागाव लागलं...
उत्तर हे निरर्थक आलं, 

अन बाकीत मात्र काहीच नाही उरलं..
केवळ पोट आहे म्हणून खावं लागलं...
अहो, माझ्या घरच्या न्याहारीची
चव पिझा-बर्गरला कसली ?
रानातली कांदाभाकर रानातच राहिली...!

दिसला नाही इथं माझ्या बापुसाचा रुबाब,
अर्धपोट माझी माय, तिनं नेसलं ठिगाळ..
नाही इथं तिच्या मायेच आभाळ,
नाही बघाया मिळलं
इथं ते हिरव शिवार,
अन नाही इथं माझ्या गावातला पार..,
अहो, मातीलाही इथल्या त्यो गंधही  नाही,
रानातली कांदाभाकर रानातच राहिली...! 

- गणेश.