Saturday, January 21, 2012

बडवे कि भडवे ?

               आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत आहे, मूर्तीत पडलेल्या भेगात M-seal   भरल्याची धक्कादायक बाब पुढे आली. प्रक्रियेसाठी आलेल्या तज्ञाकडे चौकशी केल्यास, ही गोष्ट कोणी केली हे आजून समजले नाही. मूर्ती सांभाळणाऱ्या बडव्यांना बडवून जाब विचारायला हवा. आमचा विठ्ठल , आम्ही विठ्ठलाचे परुंतु आम्ही विठूरायाची पूजा का करू नये? हे आमच्या विठ्ठलाचे वैद्कीकरण करणारे,  विठ्ठल तुम्हाला सांभाळता येईना का रे ? धांव घाली विठू आत्तां चालू नको मंद । मज मारिती बडवे काही तरी अपराधं ।। अशी एक आर्त हाक चोखामेळ्याने अभंगाद्वारे आपल्या लेकुरवाळ्या विठुरायाला दिली होती सात- आठशे वर्षांपूर्वी. पण बडव्यांनी विठोबाला बाहेर पडू दिले नाही. संत सोयराबाईने पंढरीचे ब्राह्मणें चोख्याशी छळीले । तयालागी केलें नवल देवे ।। असे सांगत विठ्ठलासह देवांचा मोठा समूहच चोख्याच्या घरी आला असे म्हटले आहे. संत बंका त्याच्याही पुढे गेले आणि म्हणाले, बंका म्हणे ऐसा कृपाळू श्रीहरी । चोखीयाचे घरी राहे सुखे ।। संतांची, वारकऱ्यांची आभाळाएवढी श्रद्धा पाहून खरोखरच पांडुरंग घालमेला झाला असावा; पण तरीही बडव्यांचा तिढा सैल होत नव्हता. साने गुरुजींनी सत्याग्रह केला; पण तरी तो सैल झाला नाही. या सत्याग्रहानंतर कुणा एका बडव्याने विठ्ठलाच्या मूर्तीतील पंचप्राण काढून घेतले आणि एका कुपीत ठेवले असे आजही लोक सांगतात. असा हा पंढरीराया आता बडव्यांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त होतो आहे. सर्वसामान्यांचा देव असलेल्या पांडुरंगाला पुरोहितशाहीपासून मुक्त करण्याचा लढा काल-परवा विद्रोही साहित्यापर्यंत पोहोचला. यापूर्वी चंद्रभागेच्या तीरावर, विठुरायाच्या पायरीवर आणि स्वातंत्र्यसेनानी शेलारमामांच्या बेमुदत उपोषणानिमित्ताने मुंबईतल्या हुतात्मा चौकात आणि नंतर १९७३ च्या कायद्यात गाजत राहिला. विठुरायावर आमचाच हक्क आहे. इतिहासातल्या वेगवेगळ्या राजवटींनी तो मान्यही केला आहे असे बडवे आणि उत्पातांचे म्हणणे होते. एका अर्थाने देवावर मालकी कुणाची अशाच आशयाचा हा लढा होता. बडवे त्यात विजयी होत होते आणि लाखो भक्त आणि आंदोलक पराभूत होत होते. एकवीस वर्षे कायद्याचा कीस पाडत, पळवाटा शोधत, लोकशाही रचनेतील तरतुदींना आव्हान देत मुंगीच्या गतीने खटला पुढे सरकत राहिला. खटला जेवढा काळ चालेल तेवढा काळ बडव्यांची सत्ताही चालणार होती. मुंबईच्या उच्च न्यायालयाने मात्र राज्य शासनाचा कायदा वैध ठरवून बडवे व उत्पातांचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. भक्तांच्या मते त्यांची विठुमाऊलीच मोकळी झाली आहे. आता ती सहज भेटेल. तिला डोळे भरून पाहता येईल.

              स्वातंत्र्यानंतर संस्थाने जशी खालसा झाली तशी ठिकठिकाणी असलेल्या प्रमुख मंदिरांतील पुरोहितांच्या विशिष्ट घराण्यांची राजवटही खलास झाली. तिरुपती बालाजी मंदिर असेल किंवा शिर्डीचे साईबाबा मंदिर असेल तेथे शासननियुक्त विश्‍वस्थांमार्फत कारभार चालू आहे. तेथील पारंपरिक पुरोहितांनी कायद्याला फार मोठा विरोध केला नाही; पण पंढरपुरात मात्र तो झाला. पंढरपूरसाठी तयार झालेल्या खास कायद्यालाही जुमानायचे नाही असे बडव्यांनी ठरवले. १९७३ चा कायदा १९८५ मध्ये अमलात आला पण तोही अंशतःच. विठोबाच्या चरणी जमा होणारी सारी संपत्ती बडवे आणि रुक्‍मिणीमातेच्या चरणी जमा होणारी संपत्ती उत्पातांच्या मालकीची होत होती. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या बाबतीत त्यांची वर्तणूक एकाधिकारशाहीची, हुकूमशाहीची होती. कुणालाच ते जुमानत नव्हते. कशालाच जबाबदार राहत नव्हते. देव आपल्या मुठीत आहे या न्यायाने वर्षानुवर्षे हा कारभार सुरू होता. शेकडो मैल वाट तुडवत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना अनेक वेळा विठोबाऐवजी बडव्यांचेच दर्शन घेऊन माघारी जावे लागायचे. काहींच्या वाट्याला शिव्या नि शाप यायचे. या साऱ्यांची चौकशी करण्यासाठी नोव्हेंबर १९६८मध्ये एक सदस्यीय नाडकर्णी समिती नेमली आणि समितीलाही हेच विदारक सत्य आढळून आले. विठुमाऊलीचे दर्शन हा श्रद्धेचा, भक्तीचा भाग नव्हे, तर तो धनशक्तीचा भाग बनवला गेला. श्रीमंत भक्तांना हवे तसे दर्शन आणि गरिबाने चंद्रभागेतच राहून हात जोडायचे अशी एक टोकाची विषमता देवाच्या दारात तयार झाली होती. मंदिरात दोन प्रकारे पैसा जमतो. एक विठुरायाच्या पायाशी आणि दुसरा व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत. भक्तांनी विठुरायाच्या चरणीच दक्षिणा टाकावी यासाठी बडवे उघडपणे विविध मार्ग अवलंबतात. कारण हा पैसा त्यांच्या मालकीचा असतो.

                    अधिक पुण्य मिळवायचे असेल तर मूर्तीच्या जवळच अधिक पैसा पडायला हवा असे एक धार्मिक अर्थकारण तयार झाले होते. देवाच्या पायाला स्पर्श करणारा पैसा कितीही आला तरी त्याचा हिशेब देण्याची जबाबदारी बडव्यांवर नव्हती. बडवे श्रीमंत होत गेले आणि भक्त आपल्या मोकळ्या खिशाला दोश देत राहिले. पैसा गोळा करण्याच्या प्रश्‍नावरून बडवे आणि शासन यांच्यातच भांडणे झाली आहेत असे नव्हे तर ती बडव्या-बडव्यांमध्येही झाली आहेत. गाजली आहेत. पैसा ट्रेजरीतला असो नाही तर देवाच्या पायाजवळचा तो कलह कसा निर्माण करतो हेही विठुरायाने पाहिले. भक्त आणि बडव्यांच्या वादातून पोलिसांत आणि पुढे न्यायालयात गेलेली प्रकरणेही विठुरायाने पाहिली आहेत. एकूणच आपल्या भक्तांच्या अडवल्या जाणाऱ्या वाटाही पाहिल्या आहेत.

                     पंढरपुरातील विठोबाचे देवस्थान एकाच वेळी अनेक कलहांचे केंद्र बनवले जात होते. कलहाचा मुख्य केंद्रबिंदू अर्थकारणात आहे. शासनाने नेमलेल्या समितीने मंदिराचा विकास करायचा, शासनाचे पैसे खर्च करायचे आणि बडव्यांनी मात्र यापैकी काहीच न करता फक्त पैसा गोळा करायचा असे चित्र निर्माण झाले. गुंतवणूक शासनाची आणि विकास बडव्यांचा असा हा प्रकार होता. मंदिराच्या अवतीभोवती विविध कारणांनी तयार झालेली विषमता सामाजिक कलहाचा विषय बनली, तर पूजेवर आमचाच हक्क आहे आणि तो वंशपारंपरिक आहे या दाव्यामुळे धार्मिक कलह तयार झाला. एकाच वेळेला अनेक कलहांत अडकण्याची वेळ या तीर्थस्थानावर आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य वारकरी आपला छळ विसरून हरिनामाच्या गजरात गुंग होत होता. विठोबा जाते ओढणाऱ्या जनीकडे, चिखल तुडवणाऱ्या गोरा कुंभाराकडे, कांद्याला विठाई म्हणणाऱ्या सावता माळीकडे आणि गुरे ओढणाऱ्या चोख्याकडे जातो तसा तो आपल्याकडेही येणारच अशा एका ठाम विश्‍वासामुळे असंख्य वारकरी बडव्यांच्या दंडेलीकडे दुर्लक्ष करीत होते. आता उच्च न्यायालयानेच ही दंडेली संपवली आहे. उद्या कदाचित हे बडवे सर्वोच्च न्यायालयात जातील, पुन्हा कालहरण करतील, कायद्यातील पळवाटा पुन्हा शोधतील हे ओघानेच आले. शासनानेही सर्वोच्च न्यायालयात ठामपणे भूमिका मांडावी. प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावे यासाठी प्रयत्न करावा. विठोबा व त्याच्या लाडक्‍या नि कष्टकरी भक्तांची सहज भेट होईल यासाठी प्रयत्न करावेत. देवस्थानावर शासनाची सत्ता आली म्हणजे जादूच्या कांडीप्रमाणे रात्रीत चमत्कार घडेल, असे समजण्याचे कारण नाही. ज्या देवस्थानांत शासनाची राजवट आहे तेथील सर्व कारभार धुतल्या तांदळासारखा आहे, असे कुणीही म्हणत नाही. तेथील वादही न्यायालयात पोहोचले आहेत. तेथेही अनागोंदी चालू आहे. तेथेही दर्शनासाठी वेगळे अर्थकारण राबविण्यात येत आहे. बाहेरचे राजकारण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. एखाद्याची राजकीय सोय म्हणून, एखादा कार्यकर्ता कुठे तरी रिचवायचा म्हणूनही देवस्थान समित्यांकडे पाहिले जाते. मंदिराचा सोपान वापरून अनेक जण सक्रिय राजकारणात येतात. धर्मस्थळाचा हा आधुनिक वापरही शासनाच्या आशीर्वादानेच चालू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भक्तांना दिलासा देणारी, देवदर्शनाची त्यांची आस पूर्ण करणारी एक निकोप व्यवस्था तयार करायला हवी. अन्य व्यवस्थांवरचा सामान्य माणसाचा विश्‍वास कमी होऊ लागला, की देवस्थानांसमोरची गर्दी वाढते आहे, हेही शासनाने लक्षात घ्यायला हवे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर म्हणजे कोट्यवधी लोकांच्या भक्तीचा एक सहज सुंदर हुंकार आहे हेही बडव्यांनी कधी तरी समजून घ्यायला  हवे. ज्याचा देव त्याच्या हवाली केला, असे आनंदाने सांगायला हवे.