Monday, January 27, 2020

2020 आणि महासत्तेच भंगलेलं स्वप्न...

'इंडिया व्हिजन 2020 -अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' डॉ. अब्दुल कलामांनी हे पुस्तक लिहिले होते. आपण 2020 मध्ये महासत्ता होऊ, जेव्हा भारतरत्न अब्दुल कलाम असं म्हणाले होते त्याच्यापेक्षाही आज देशाची खूप बिकट परिस्थीती आहे. जीडीपी 4.5 वर घसरला आहे, शेतकरी आजही आत्महत्या करतोय, देशासमोर आर्थिक मंदीच संकट उभं ठाकलं आहे. कलामांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सपशेल अयशस्वी ठरलोय, हे आपल्याला मान्य करावे लागेल. आजही विचार केला तर भविष्यातही भारत कधी महासत्ता होईल की नाही याची हमी आपण देऊ शकत नाही. 2020मध्ये भारत महासत्ता का झाला नाही, यावर आज विचारमंथन आणि प्रयत्न होणं गरजेच आहे. 1947 रोजी भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत देश म्हणून टिकेल की नाही? असा प्रश्न तोंड वर काढत होता.

बीबीसीच्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, भारतात लोकशाही टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. परंतू आज भारताच्या दृष्टीने या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सकारात्मक आहे.  मग महासत्तेच्या बाबतीत आपण कुठं कमी पडलो ? स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्त्ता होण्याच्या वाटेवर चालत होतो का ? आपण महासत्ता म्हणून जगासमोर येवू शकलो नाही याचे विनोदात्मक मिम्स कारण याला ट्रोल करण्यापेक्षा आजच्या तरुणांना  चिंतन करायला लावणारा हाविषय आहे .

अर्थ, क्रीडा , शिक्षण, नविन रोजगारनिर्मिती, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपण पिछाडीवर आहोत. आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार ?शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. आज अनेक सरकारी संस्था विकायची का आली ?

या सर्व प्रश्नांच्या मुळाशी आणखी एक प्रमुख  कारण दडलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेची मूळं आहेत इथल्या शिक्षणपद्धतीमध्ये आणि शेतीविषयक धोरणांमध्ये! कलाम म्हणाले होते आजचा तरुण वर्ग भारतला महासत्ता घडविण्याचा पाया आहे. तरुण वर्ग अर्थताच शिक्षित असलेला आणि शिक्षण घेत असणारा. म्हणजेच शिक्षण देण्याच्याबाबतीत आपण अपयशी ठरतोय. बिजे रोवून त्याला योग्य खतपाणी नाही घातले, तर मधूर फळे चाखायला मिळणार नाहीत, हे साधे समीकरण आहे.

शिक्षणपद्धती आणि योग्य शिक्षण हाच नवा समाज घडवण्याचा ताबा असतो. येत्या काही  वर्षांत इंग्लंडमधील अनेक विद्यापीठे ज्ञानाची प्रमुख उर्जाकेंद्रे बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु झालेले आहेत. जर्मनी ,कोरिया, रशिया यासारखे बलाढ्य देश अमेरिकेचे महासत्तापद काबीज करण्यासाठी नेमके काय करावे लागेल याचा विचार करत शिक्षणात त्या दृष्टिकोनातून बदल घडवत आहेत. चीनही स्वतःची शिक्षणपद्धती जागतिक दर्जाची बनवण्यासाठी चीकाटीने प्रयत्न करत आहे. शिक्षणात चीनी भाषेचा वापर वाढवत आता काही संगणकीय भाषाही चीनी केल्या आहेत. आणि याची फळे चीनला मिळतही आहेत. आपण असा विचार करणे तर सोडा, आजच्या समस्या कशा सोडवायच्या या प्रश्नाच्या गर्दीत अडकलो आहोत. सध्याचा तरुणांमधील बेरोजगारी , त्याबद्द्ल त्यांचा संताप आणि नैराश्य ही त्याचीच अटळ फलश्रुती आहे. याला इथले राजकीय वातावरण ही तितकेच कारणीभूत आहे. असे होण्यामुळे तरुणांची शिक्षणाबद्दलची अवस्था निर्जीव झाली आहे. ज्या पद्धतीने ते शिकले आहेत त्यात स्वत:च आळशी राहिल्याने, जिज्ञासेची साथ सोडल्याने त्यांना जगण्याचे कोणतेही कौशल्य कमावता आलेले नाही. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे उद्धिष्ठ काय हेच नेमके माहीत नाही. आपण देशाच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःला रोजगार मिळवण्यासाठी नोकरी करणार आहोत असा अनेकांचा भ्रम असतो. अर्थात पोट भरण्यासाठी किंवा कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच, किंबहुना त्याबरोबरच जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. आणि हेच आपली शिक्षणपद्धती विसरली आहे आणि आजही असे आम्ही करत नाही आहोत. आजचा अमेरिका हा नोकऱ्या निर्माण करणारा देश आहे, तर भारत नोकरदार तयार करणारा.

आज  केवळ उदारनीरवाह या अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखादं-दुसरं उदाहरणं वगळता जागतीक ज्ञानात भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही. जगभरात जितके संशोधन झाले त्यात भारतीय संशोधक बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

स्वत:चे व्यक्तिगत भविष्य हे जर केवळ रोजगारासाठी भूकेलेल्या स्पर्धकाचे असेल तर आम्ही अनेक वर्षापासून कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करत होतो? हे खरे आहे की महासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते

- गणेश आटकळे 

Thursday, December 12, 2019

युवादिन विशेष

अब्दुल कलाम म्हणाले होते, २०२० सालात भारत महासत्ता बनलेला असेल आणि आजचे तरुणच असा भारत घडवतील, परंतु आज तशी परस्थिती दिसत नाही. किंबहुना याउलटच आजचे चित्र आहे. रस्त्याने चालताना आपण जेव्हा एखाद्या तरुणाला श्रद्धांजली वाहील्याचा बॅनर पाहतो तेव्हा आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आज भारताची युवाशक्ती भरकटलेली दिसत आहे. अनेक तरुण दारू, गुटखा, सिगारेट  अशा अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आपणाला दिसतील. ढाब्यावर किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणे प्रतिष्ठीत असते, असा गैरसमज तरुणांमध्ये सध्या रूढ होताना दिसत आहे. रस्त्याने गाडी चालवतानाही तरुणांचे रक्त जाम सळसळत असतं. आज अनेक अपघात होत असतानाही यातून बोध घेतला जात नाही.

क्रीडा, कला, साहित्य, व्यवसाय या क्षेत्रांत रुजू असलेल्या अनेक युवकांकडून अशा भरकटलेल्या तरुणांनी उर्जा प्रेरणा घ्यावी. क्रीडा क्षेत्रातून आपल्याला अशी बरीच नावे घेता येतील. नेहमीच क्रिकेटमध्ये अव्वल राहणारा धडाकेबाज फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवणारी हेमा दास, २०१९ अशियन एथेटिक्स चॅम्पियनशिप मिळवणारी गोमती मारीमुथू.

विराट कोहली. या युवकाला कोण ओळखत नाही? याने आपला डंका जगभर वाजवला आहे? विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहेत. मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना विराट सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं होतं." विराटने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता. तो म्हणतो "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण येते." स्वतःला सावरत विराटने आपली जिद्द कायम ठेवली आहे. गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रशिक्षणासाठी  त्याने क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला होता. क्रिकेट अकादमीमध्ये विराटने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला. नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.  खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत. आज विराटची लौकिकता कुणाला सांगायची गरज नाही. विराट जगभरात गाजलेल्या सर्वच क्रिकेटपटुंचे रेकॉर्ड तोडत चालला आहे. आजच्या युवकांना क्रिकेटबरोबर प्रो-कब्बडी, कुस्ती लीग, ॲथलेटिक्सचे अनेक खुले पर्याय आहेत.

विराटबरोबर हिमा दासची प्रेरणादायी कहाणी आहे. हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण देणारे प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली.  पुढे जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ४०० मीटर धावण्यासाठी तिने केवळ ५१.४६ सेकंदांची वेळ घेतली. या कामगिरीमुळे ती अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू लागली.   तिच्या यशामुळे २०१८ मध्ये हिमाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला. 

व्यवसायामध्ये जगभर लौकिकता मिळवणारे आजचे भारतीय तरुण संख्येने कमी असणे ही आपली शोकांतिका आहे. फ्लिपकार्ट चालू करणारे सचिन बनसल आणि बिन्नी बनसल, ओयो हॉटेल्सचा संस्थापक राजेश अग्रवाल, येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले अशी काही नावे घेता येतील.
फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना सचिन बनसल आणि बिन्नी बनसल या सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या दोघांनी सन २००७ मध्ये केली. फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. वाचनाचं वेड असणाऱ्या या दोघांनी सुरुवातीच्या काळात आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते, परंतु आता फ्लिपकार्ट वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर दैनदिन वापरातल्या वस्तूंची विक्री करते. काही दिवसापूर्वीच फ्लिपकार्टचा वालमार्ट या कंपनीशी एकत्रित व्यवसाय करण्याचा करार झाला आहे. 

रितेश अग्रवाल. २०१२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी याने ओयो हॉटेल्सची स्थापना केली. ज्याला ओयो होम्स आणि हॉटेल्स म्हणून देखील ओळखले जाते, ही एक भारतीय हॉटेल साखळी आहे. ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची आणि भाड्याने घेतल्या जाणाऱ्या फ्रेंचाइज्ड हॉटेल्स, घरे किंवा  राहण्याच्या जागेची वेगवान वाढणारी आतिथ्य साखळी आहे.  सुरुवातीला भांडवलाची तडजोड करून ‘ऑरवेल स्टे’ उलाढाल वाढल्यानंतर ‘ओयो रूम्स अँड हॉटेल्स’ अशी नामांतरित करण्यात आली. आज कंपनीची किंमत १० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. विविध देशात कंपनीची अनेक कार्यालये आहेत. हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक अनेक कंपन्यांशी ‘ओयो’ करार करत आहे. असे १८ ते ३५ वयोगटातले अनेक नावाजलेले युवक आजच्या युवकांना खूप काही शिकवून जातात. ३२ वेगवेगळे व्यवसायाचे प्रयोग करून ३३ व्या प्रयोगात यशस्वी झालेले येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले यांनीही आपला व्यावसाय विश्वव्यावी करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांच्या आजच्या यशाचे कारण त्यांची मेहनत, चिकाटी इतर व्यवसाय यशस्वी का होतात हे पाहण्याची निरीक्षण क्षमता! बरिस्ता, सी.सी.डी. , डॉमिनोज पिझा, मॅकडोनाल्ड बर्गर  हे परदेशी व्यवसाय भारतात यशस्वी का झाले हेही आजच्या तरुणांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि आपली जिद्द कायम ठेवत युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. 

 

विराट कोहली (कर्णधार- भारतीय क्रिकेट संघ, वय ३१ )

 
हिमा दास (वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन वय २० )


 


सचिन बनसल आणि बिन्नी बनसल ( संस्थापक - फ्लिपकार्ट) 

रितेश अग्रवाल ( संस्थापक - ओयो रूम्स अँड हॉटेल्सचे,  वय २५)